लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर: संततधार पावसामुळे संपूर्ण सांगलीला पुराने वेढा घातला असून या वेढयात मलकापुरातील संचेती परिवारातील सदस्य गत चार दिवसांपासून सांगलीतच अडकले आहेत. ते सुरक्षित स्थळी असले तरी येथून आपल्याला गावी कधी व कसे जाता येईल याची चिंता त्यांना आता सतावू लागली आहे.पावसाच्या पाण्याने रौद्र रूप धारण केल्यामुळे आलेल्या महापुराने अध्यार्हून अधिक सांगली शहराला पाण्याखाली घेतले आहे. महापुराने 52 फुटाची पातळी गाठली, त्यामुळे सांगलीतील अनेक चौक पाण्याखाली गेले. अनेक रस्ते मुख्य मार्ग बंद झाले. बाजारपेठेतही पाणी शिरल्याने त्याही बंद झाल्या. अशा भयावह परिस्थितीने सांगलीकर सद्यस्थितीत आपला जीव मुठीत धरून जीवन व्यथीत करीत आहे. अशा बिकट परिस्थितीत मलकापुरातील संचेती परिवारातील चार सदस्यही अडकले आहेत.मलकापुरातील अभय संचेती, त्यांची वहिनी सौ सुनिता विजय संचेती, पुतण्या संकेत संचेती व मुलगी दिशा संचेती आदी चार जण ६ आॅगस्ट रोजी सांगली कडे गुरुदेवांच्या दर्शनाकरिता रवाना झाले. ७ आॅगस्ट रोजी माधव नगरातील पाटीदार संघ येथे गुरुदेवांचे दर्शन त्यांनी घेतले. मात्र संपूर्ण सांगलीला पुराने वेढा घातल्यामुळे त्यांच्या परतीचा मार्ग बंद झाला. सांगलीतील समाज भवन मध्ये त्यांना समाज बांधवांच्या वतीने आश्रय देण्यात आला. मात्र तेथेही पाच फूट पाणी घुसल्याने येथून त्यांना जैन श्री सावक संघ येथे यावे लागले. येथे रात्रीचा मुक्काम केला. पहाटेच्या सुमारास येथेही पाणी घुसू लागले. त्यामुळे त्यांना येथूनही नेमिनाथ नगर स्थित राजमती मंगल कार्यालयात आश्रयास यावे लागले. स्थानकावरून रेल्वे मिळते का याबाबत प्रत्यक्षरीत्या जाऊन व भ्रमणध्वनीद्वारे चौकशी केली असता येथून बाहेर जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या बंद असल्याचे त्यांना वेळोवेळी समजले.
चार दिवसांपासून आम्ही सांगलीत पुरामुळे अडकलो आहोत. अशा अशा बिकट परिस्थितीत आम्हाला समाज बांधवांची सर्वतोपरी मदत होत असून समाज बांधवांनी आमची राहण्याची व खाण्या-पिण्याची उत्तम व्यवस्था केली आहे. त्यामुळे या समाज बांधवांचे खरंच मानावे तेवढे आभार कमीच आहे.- अभय संचेतीमलकापूर