महायुतीमध्ये रिपाइंला हव्यात २0 जागा
By admin | Published: September 2, 2014 12:42 AM2014-09-02T00:42:26+5:302014-09-02T00:42:26+5:30
खा. आठवले : विदर्भात ८ जागा लढणार
बुलडाणा : विधानसभेसाठी ५७ जागांची यादी आम्ही महायुतीकडे दिली आहे. त्यापैकी किमान २0 जागा रिपाइंला मिळाव्यात, असा आमचा आग्रह राहणार आहे. यामध्ये विदर्भातील ८ जागांचा समावेश असल्याची माहिती रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी सोमवारी बुलडाणा येथे पत्रकार परिषदेत दिली. शिवसेना-भाजपचा तिकीट वाटपाचा तिढा अद्याप सुटला नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटला नसला तरी, आमची यादी आम्ही भाजप-सेनेकडे दिली आहे. लवकरच यावर निर्णय होईल. आघाडी सरकारला सत्तेवरून खाली खेचणे हा आमचा एकमेव उद्देश असल्याने वेळप्रसंगी जागा वाटपासंदर्भात तडजोड करू, असे खा. आठवले यांनी सांगितले. विदर्भातील मेहकर, मोर्शी, उमरखेड, तिवसा, वर्धा, उत्तर नागपूर, भंडारा, अर्जुनी मोरेगाव या आठ जागा रिपाइं लढविणार असल्याचे ते म्हणाले. गत लोकसभा निवडणुकीत रिपाइंचे मतदार मोठय़ा प्रमाणात महायुतीकडे वळल्याचे निकालानंतर दिसून आले. आता शिवसेना-भाजपने त्यांची मते आमच्याकडे वळती करावीत. आघाडी सरकारला सत्तेवरून खाली खेचायचे असेल तर रिपाइंला वगळून ते शक्य होणार नाही, असेही ते म्हणाले. रिपाइंला नेहमीच पडणार्या जागा दिल्या जातात, यावेळी असे झाल्यास युती तोडणार का, यावर आठवले म्हणाले की, लोकसभेत आम्ही महायुतीला प्रामाणिकपणे साथ दिली, तरीही आमचा उमेदवार पडला. आता त्यांची वेळ आहे. पडणार्या जागा दिल्या, तरी त्या निवडून आणण्यासाठी महायुतीतील सर्वांनीच सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे. प्रत्यक्षात तसे न झाल्यास युतीबाबत विचार करू, असा इशाराही त्यांनी दिला. स्वतंत्र विदर्भ राज्याची आमची मागणी कायम आहे. देशातील जमिनीचे राष्ट्रीयीकरण करावे, त्यामुळे एकही व्यक्ती भूमिहीन राहणार नाही, तसेच गरिबी कमी करण्यास मदत होईल. विदर्भातील झुडपी जंगलाची जमीन वाटप करावी, त्यासाठी वन कायद्यात बदल करावा, ही मागणी आपण केंद्र सरकारकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत माजी आ. अनिल गोंडाणे, सुधाकर तायडे, ब्रम्हानंद चव्हाण, मिलिंद शेळके, बाळासाहेब इंगळे, सुधाकर तायडे तसेच रिपाइंचे जिल्हाध्यक्ष नरहरी गवई, स्वाभिमानीचे रविकांत तुपकर आदी उपस्थित होते.