बुलढाणा जिल्ह्यात कोविड सानुग्रह निधी वाटपात घोळ!
By अनिल गवई | Published: November 12, 2022 06:07 PM2022-11-12T18:07:02+5:302022-11-12T18:07:42+5:30
निधी वसुलीसाठी संबंधितांना नोटीस: निकटच्या एकापेक्षा अधिक नातेवाइकांनी लाटला निधी
अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : कोविड विषाणू संसर्ग आजाराने मृत्युमुखी तसेच कोविड आजाराच्या निदानानंतर आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीच्या निकट नातेवाइकांना सानुग्रह निधी वाटपात प्रचंड घोळ झाल्याचे समोर येत आहे. निधी वितरणाचे दायित्व असलेल्या ‘ऑनलाइन’ वेब पोर्टलमधील अनेकांनी यात हात धुवून घेतले. आता, निकटच्या नातेवाइकांच्या पाठीमागे शासनाने सानुग्रह निधी परतीसाठी ससेमिरा लावला आहे. सानुग्रह निधी बळकाविणाऱ्यांना आता तहसीलदारांमार्फत नोटीस बजावण्यात येत आहेत. कोविड काळात मृत्युमुखी पडलेल्यांच्या निकटच्या नातेवाइकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र राज्यात जी व्यक्ती कोविड-१९ या आजारामुळे निधन पावली. तसेच जर त्या व्यक्तीने कोविड-१९ चे निदान झाल्यामुळे आत्महत्या केलेल्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाइकास ५० हजार रुपये इतके सानुग्रह साहाय्य राज्य आपत्ती निधीमधून देण्यात आले. ही मदत मिळण्यासाठी मृत व्यक्तीच्या निकट नातेवाइकाने शासनाच्या वेब पोर्टलवर आॅनलाईन अर्ज करणे आवश्यक होते. त्यासाठी मृतकाच्या एकापेक्षा अधिक नातेवाइकांनी अर्ज केले. या अर्जाची पडताळणी न करताच सानुग्रह निधीचे वितरण करण्यात आले. मृतांच्या आकड्यात आणि सानुग्रह निधी वितरणात प्रचंड तफावत आढळून आली. त्यानंतर जिल्हास्तरीय यंत्रणेकडून पडताळणीनंतर एकापेक्षा अधिक सानुग्रह मदत मिळालेल्या कुटुंबातील सदस्यांना निधी परत करण्यासाठी तहसीलदारांमार्फत नोटीस बजावल्या जात आहेत.
निधी परत करण्यावरून उद्भवताहेत वाद!
कोविड आपत्तीत बाप-लेकाला, लेक-बापाला आणि नातेवाईक आप्तेष्टांना दुरावल्याची अनेक प्रकरणे पुढे आली. आजाराने मृत्युमुखी पडलेल्या कित्येकांचे अंत्यसंस्कार शासकीय यंत्रणांकडून करण्यात आले. मात्र, मृत्यूनंतर सानुग्रह निधीसाठी मृतकाच्या एकापेक्षा अधिक नातेवाइकांनी आॅनलाइन अर्ज केले. मृतकाची शुश्रूषा करणाऱ्या लाभार्थ्याने की, दुसऱ्याने पैसे परत करावे? यावरून ग्रामीण भागात वाद् उद्भवत आहेत.
अनेक ठिकाणी नातेवाईक अडकले!
कोविड आपत्तीत नातेवाइकांना सानुग्रह निधी मिळवून देण्यासाठी काही एजंट समोर आले. वेब पोर्टलवर आलेल्या अर्जाची पडताळणी न करताच, राज्य शासनाने निधीचे वितरण केले. यासाठी एजंटांनी नातेवाइकांकडून काही रक्कमही हडपली. मात्र, आता पडताळणीनंतर नातेवाइकांना नोटीस मिळत आहे. आता सानुग्रह निधी लाटणारे नातेवाईकच कोंडीत सापडल्याचे समोर येत आहे.
जिल्ह्यात ६९१ जणांचा मृत्यू
बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत ९९ हजार ९१७ जण कोविड पॉझिटिव्ह आढळून आलेत. ९९ हजार २२३ जण या आजारातून बरे झालेत, तर जिल्ह्यातील ६९१ जणांचा मृत्यू झाला. यापैकी बहुतांश जणांच्या एकापेक्षा अधिक निकटच्या नातेवाइकांनी सानुग्रह निधीसाठी अर्ज केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"