लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर (बुलडाणा): ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात काळी पिवळीने आॅटोला जबर धडक दिली. या अपघातात २ प्रवाशी ठार १६ प्रवाशी जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर धानोरा शिवारातील नेपाळी ढाब्याजवळ घडली. नांदु-याकडे जाणा-या एम.एच.२८ एच. ५३७ या क्रमांकांच्या काळीपिवळी टॅक्सीने ओव्हरटेकच्या प्रयत्नात मलकापूरकडे जात असलेल्या एम.एच.२८ टी. ३६४३ या आॅटोरिक्षाला धडक दिली. या धडकेत मोहन हरिचंद्र दांडगे (वय४०) रा. बेलाड हे जागीच ठार झाले. तर कु. वैष्णवी मोहनसिंग चव्हाण (वय १३) रा. बहापुरा हिला उपचारार्थ रुग्णालयात खासगी वाहनाद्वारे नेत असतांनाच तीची प्राणज्योत मालवली. या अपघातात शेख ईसाक शेख मोहम्मद (वय ६५) रा. मलकापूर, हमीदशाह सुभानशाह (वय ३५) रा. निमगाव, संतोष मोतिराम डब्बे (वय२७) रा. वडनेर भोलजी, शेख नजीम शेख मुमताज (वय ३०) रा. वडनेर भोलजी, प्रमिला झनके (वय ३५) रा. बहापुरा, कविता अशोक वानखेडे (वय ६०) रा. बहापुरा, मोहनसिंग चतरसिंग चव्हाण (वय ३०) रा. बहापुरा, विद्या मोहन दांडगे (वय ३५) रा. बेलाड आदी गंभिररित्या जखमी झाले.
जखमींना उपचारार्थ मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. यातील पाच जखमींना बुलडाणा व जळगाव खांदेश येथे उपचारार्थ पाठवण्यात आले. तर सिद्धार्थ मारोती गवई (वय ५५) रा. वडी, सुरज महादेव मानकर (वय १४) रा. वडी, शेख नईम निसार अहेमद (वय २४) रा. वडी, शिवशंकर प्रभाकर सुशिर (वय ३७) रा. वडी, विनोद भोजने, भास्कर जगन्नाथ वक्टे रा. खामगाव या सहा जणांना वडनेर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी भरती करण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी गिरिश बोबडे यांनी घटनास्थळी भेट दिली.