मलकापूरातील बारादारीत दोन गटात वादानंतर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 9:21 PM
मलकापूरातील बारादारीत दोन गटात वादानंतर दगडफेक झाली आहे.
मलकापूरः येथील बारादारी भागातील पायविहीरीजवळ दोन समाजाच्या गटात आधी वाद त्यानंतर दगडफेक झाल्याची घटना आज शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांनी त्यांच्या तुकडीसह घटनास्थळ गाठल्याने वातावरण तुर्तास निवळले. यात पोलिसांनी १५ ते १६ जणांना ताब्यात घेतले असून शहरात मात्र खळबळ उडाली आहे.या संदर्भात प्राप्त माहिती अशी की, येधील बारादारित पायविहीर व नागोबा मंदिर या एक समाज वरच्या बाजूला तर दुसरा समाज खालच्या अंगाला वास्तव्यास आहे.आज शनिवारी सकाळी वरच्या बाजूला वास्तव्य करणारी चार ते पाच मुल तोंडावर रूमाल न बांधता नागोबा मंदिर परिसरात भटकंती करीत त्यांना काही हटकले असता वाद झाला.संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास वरच्या अंगावर वास्तव्य करणाऱ्या मुलांचा पायविहीरीजवळ सोनू हांडगे नामक व्यक्तीशी वाद झाला. त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले.थोड्या वेळात दोन्ही बाजूने असंख्य मुले गोळा झाली. शाब्दिक चकमकीनंतर हाणामारी झाली. त्यात वरच्या अंगात वास्तव्य करणाऱ्यांकडून जबरदस्त दगडफेक करण्यात आली. खालूनही प्रतीउत्तरात दगडफेक झाली. त्यामुळे बारादारीत एकच खळबळ उडाली.या घटनेची माहिती कळताच पोलिस निरीक्षक कैलास नागरे त्यांच्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कारवाईचा बडगा उगारल्याने हाणामारी करणाऱ्यांनी पळापळ केली. तब्बल अर्ध्या तासानंतर वातावरणात निवळले. पोलिसांनी १५ ते १६ जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. घटनेच नेमके कारण अजून समोर आले नाही. बारादारित मात्र तणावपूर्ण शांतता आहे. (तालुका प्रतिनीधी)