गजानन तिडके
देऊळगाव राजा : डॉ़ बाबासाहेब आंबेडकर सिंचन योजनेसाठी तालुक्यातील ६५ पैकी ५४ गावे वगळण्यात आल्याने शेकडो मागासवर्गीय शेतकरी सिंचनाच्या लाभापासून वंचित राहणार आहेत़; त्यामुळे, पात्र शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे़ पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष देऊन वगळलेल्या गावांचा पुन्हा समावेश करण्याची मागणी हाेत आहे़
महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या कृषी स्वावलंबन योजना २०२०-२१ या आर्थिक वर्षात या योजनेंतर्गत तालुकापातळीवर आदेश प्राप्त झाले आहेत़ यापूर्वी ही याेजना अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी, विशेष घटक योजना सन १९८२-८३ पासून सन २०१६- १७ पर्यंत राबविण्यात येत होती़ कृषी विभागाच्या २४-२-२०१६च्या शासन निर्णयान्वये सुधारणा करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली़ या समितीच्या अहवालातील शिफारशींनुसार योजनेचे नाव बदलून डॉ़ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना असे नामकरण करण्यात आले़ २०२०-२१ साठी तालुका पातळीवर योजना राबविण्यासाठी आदेश प्राप्त झाले़
असा मिळताे याेजनेत लाभ
शंभर टक्के अनुदानावर देण्यात येणाऱ्या योजनेपैकी नवीन विहीर दोन लक्ष ५० हजार मर्यादा जुनी विहीर दुरुस्ती ५० हजार, इन वेल बोअरिंग वीस हजार, पंप संच एकूण २० हजार आणि वीजजोडणी आकार १० हजार, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण एक लक्ष रुपये व सूक्ष्म सिंचन संच, त्यामध्ये ठिबक सिंचन ५० हजार आणि तुषार सिंचन २५ हजार, आदी याेजना १०० टक्के अनुदानावर देण्यात येत आहे़; परंतु यामधील सिंचनाचा महत्त्वपूर्ण घटक असलेल्या नवीन विहिरीसाठी तालुक्यातील ५४ गावे वगळण्यात आली आहे़
याेजनेतून ही गावे वगळली
या याेजनेतून भिव गाव चिंचखेड, देऊळगाव मही, धोत्रा, दिग्रस बुद्रुक, डो ढ्., गारखेड, मंडपगाव, नागनगाव, पिंपरी आंधळे, सरंबा, सुलतानपूर, सुरा, नारायण खेड, वाकी बुद्रुक, वाकी खुर्द, अंभोरा, असोला जहांगीर, बामखेड, बोराखेडी बावरा, चिंचोली बुरकुल, दगडवाडी, देऊळगाव राजा ग्रामीण, दिग्रस खुर्द, डोईफोडे वाडी, गारगुंडी, गिरोली खुर्द, गिरोली बुद्रुक, गोळेगाव, गोंदन खेड, जांभोरा, जवळखेड, जुमडा, खल्याळ गव्हाण, किणी पवार, कुंभारी, मेहुना राजा, निमगाव गुरू, पळसखेड मलक, देव पळसखेड झाल्टा, पांगरी माळी, पिंपळगाव बुद्रुक, पिंपळगाव, चिलम का पिंपळनेर, रोहना, सावखेड भोई, सावंगी टेकाळे, सिंगाव जहागीर टाकरखेड वायाळ, तुळजापूर, उंबरखेड, आदी गावे वगळण्यात आली आहेत़
भूजल सर्वेक्षण नियमानुसार सदर गावे अंशतः शोषित,(सेमी क्रिटिकल) झोनमध्ये येत असल्यामुळे शासन निर्णयानुसार वरील गावे वगळण्यात आली आहेत. यासाठी कृषी विभागामार्फत पत्रव्यवहार करून वंचित गावे सदर योजनेमध्ये घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे़
बी. आर. लवंगे, कृषी अधिकारी, पंचायत समिती, देऊळगाव राजा