बाजार समित्या बंद असल्याने शेतमाल पडून ; ‘कोरोना’मुळे बिघडले शेतकऱ्यांचे अर्थचक्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 05:32 PM2020-04-06T17:32:31+5:302020-04-06T17:34:59+5:30
लागवडीसाठी घेतलेला पैसा परत करण्यासाठी त्यांना हाती आलेला शेतमाल विकणे गरजेचे आहे.
- योगेश देऊळकार
बुलडाणा : सध्या रब्बी हंगामातील शेतमाल शेतकºयांच्या हाती आला आहे. मात्र बाजार समित्या बंद असल्याने विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे. खासगी व्यापाºयांकडूनही खरेदी ठप्प असून शेतमाल घरातच पडून आहे. एकंदरीतच ‘कोरोना’मुळे शेतकºयांचे अर्थचक्र बिघडले आहे.
जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम शेतकºयांच्या हातून गेला. परतीच्या पावसाने ऐन पिक काढणीला आले असतानाच मुक्काम ठोकल्याने प्रचंड नुकसान झाले. पेरणीचा खर्चही शेतकºयांच्या हाती आला नाही. मात्र सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने प्रकल्पांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला. त्यामुळे शेतकºयांची रब्बी हंगामातील सिंचनाची चिंता पूर्णपणे मिटली; असे असले तरी अनेक ठिकाणी शेतजमिनीत ओलावा जास्त राहिल्याने रब्बी हंगाम लांबणीवर गेला. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असल्याने विलंब होऊनही शेतकºयांनी रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली. खरीप हंगामातील उणीव रब्बी हंगामातील पिकांच्या माध्यमातून भरून निघेल, अशी अपेक्षा बाळगून शेतकºयांनी उसणवारी करून पेरणी केली. सद्य:स्थितीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त शेतकºयांच्या पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. लागवडीसाठी घेतलेला पैसा परत करण्यासाठी त्यांना हाती आलेला शेतमाल विकणे गरजेचे आहे.
दरम्यान, ‘कोरोना’ संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यातील बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांना आपला शेतमाल विकणे अशक्य झाले आहे. खासगी व्यापाºयांनीही व्यवसाय सुरू न ठेवता खबरदरी म्हणून घरातच थांबणे पसंत केल्याने शेतकºयांसमोर खूप मोठा आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. पेरणीसाठी उसणवारीने घेतलेले पैसे फेडायचे कसे, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. आता ‘लॉकडाऊन’ संपल्यावर बाजार समित्या सुरू होण्याची वाट पाहण्याशिवाय शेतकºयांसमोर दुसरा पर्याय शिल्लक नसल्याचे चित्र आहे.
रब्बी पिकांना गारपीटीचा तडाखा
रब्बी हंगामातील पिकांना काही प्रमाणात अवकाळी पाऊस व गारपीटीचा तडाखा बसला. जिल्ह्यातील काही भागात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे उत्पादनातही काही प्रमाणात घट आली आहे. आता शेतमाल विक्रीविना पडून असल्याने शेतकºयांच्या अडचणीत वाढ झाली आहे.