मनोज पाटील
मलकापूर : सद्य:स्थितीत सर्वत्र शेतशिवारात खरिपाच्या पेरणीची लगबग सुरू आहे. दरम्यान, बाजारात एक नवनिर्मित मानवचलित लहानसे पेरणी यंत्र उपलब्ध झाले असून सदर यंत्राची हाताळणी अत्यंत सुलभ व सोयीची आहे. त्यामुळे वेळेची व पेरणी खर्चाची बचत होऊन पेरणीसुद्धा योग्य पद्धतीने होत असल्याने सदर नवनिर्मिती पेरणी यंत्र शेतकऱ्यांकरिता वरदान ठरू पाहत आहे. महत्त्वाचे म्हणजे हे पेरणी यंत्र मोताळा तालुक्यातील मौजे दाभाडी या छोट्याशा गावात एका तरुण शेतकऱ्याकडे उपलब्ध आहे.
मानवचलित पेरणी यंत्र ॲक्रेलिक फायबरपासून तयार करण्यात आले असून यंत्र हाताळणीकरिता लोखंडी हँडल देण्यात आले आहे. तसे पाहता यंत्र नाजूक दिसत असले तरी त्याने आपला टणकपणा चांगलाच जपला आहे. या यंत्राला कसलाही दुरुस्ती खर्चसुद्धा लागत नाही. त्यामुळे यंत्राचा वापर करणे प्रत्येकाला परवडणारे आहे. या यंत्राद्वारे शेतात खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामातील प्रत्येक पिकाची पेरणी होऊ शकते. जवळपास एका तासामध्ये दोन ओळींतील अंतर चार फूट असल्यास एक एकर क्षेत्र एका तासामध्ये पूर्ण होते. दोन ओळींमधील अंतर दोन फूट असल्यास दोन तासांमध्ये एका मजुराकडून पेरणी पूर्ण होते. या यंत्राने आपण १-२-३-४-५-६ अशा पद्धतीने आपल्याला अपेक्षित असे बी टाकू शकतो. तसेच दोन बियाण्यांमधील अंतर सहा इंचांपासून दोन फुटांपर्यंत आपण ठेवू शकतो. विविध पिके लागवड करताना एकरी अंदाजानुसार जे मनुष्यबळ लागतं ते पाहता या यंत्राद्वारे केवळ एकच व्यक्ती त्या मनुष्यबळाप्रमाणे पेरणी करू शकतो; त्यामुळे मजुरीचा अवाढव्य खर्च आपसूकच कमी होतो. उदाहरणार्थ, एका माणसाकडून दिवसभरामध्ये ३० मजुरांचे काम या यंत्राद्वारे सहजरीत्या करता येते. पेरणी दरम्यान ज्या पद्धतीने ज्या अंतराने बियाण्यांची लागवड करायची आहे त्या अंतराची ॲडजस्टमेंटसुद्धा या यंत्रात होते. त्यामुळे पेरणीकरिता लागणाऱ्या मजुरांची गरजसुद्धा भासत नाही व स्वतःकडे यंत्र असल्याने वेळेची बचत होऊन वेळेवर पेरणीसुद्धा होते.
पेरणीवर होणारा खर्च व वेळ पाहता तो वाचावा, पेरणी सुलभ व्हावी या अनुषंगाने मी तमिळनाडूतून मानवचलित पेरणी यंत्र आणून आधी ते स्वतः वापरले. त्याचा फायदा पाहता हा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा, या भावनेतून मी सदर यंत्र मागणीनुसार नफा ना तोटा या तत्त्वावर शेतकऱ्यांना आणून देत आहे.
- योगेश पांडुरंग पाटील.
शेतकरी,रा. दाभाडी, ता. मोताळा
हे पेरणी यंत्राद्वारे मी माझ्या दोन मजुरांकरवी दोन दिवसांत पाच एकरांत सोयाबीनची पेरणी आटोपली. तसं पाहता या पेरणीकरिता मला जवळपास २०० रुपये प्रतिमजुराप्रमाणे ५० मजूर लागले असते़ अर्थात या पेरणीवर मला १० हजार रुपये मजुरी द्यावी लागली असती. मात्र या पेरणी यंत्रामुळे माझा खर्च वाचला. शेतात वापरून शेत पेरणीयोग्य असल्यास या यंत्राद्वारे पेरणी करणे अत्यंत सुलभ असून पेरणीसुद्धा अत्यंत व्यवस्थितपणे होते असाच चांगला अनुभव या मानवचलित यंत्राचा मला आला आहे.
- दत्तात्रय नारायणराव झनक
शेतकरी, रा. मांगुळ झनक, ता. रिसोड
मागील वर्षी रब्बी हंगामात मी माझ्या शेतात सोयाबीन, भुईमूग व उडीद या पिकाची पेरणी या यंत्राद्वारे केवळ दोन मजुरांकरवी करून घेतली. तसं पाहता या पेरणीकरिता मला जवळपास ३५ मजूर लागले असते. या यंत्रामुळे तो मजुरीचा खर्च माझा निश्चितच वाचला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जर हे मानवचलित यंत्र शेतात पेरणीकरिता वापरले तर मजुरीकरिता शेतकऱ्यांची होणारी भटकंती थांबून सर्व पेरणी अत्यंत सुलभ पद्धतीने करता येऊ शकते.
- अरविंद भास्कर पाटील
शेतकरी, रा. दाभाडी, ता. मोताळा