कोवीड सेंटरमधील वैद्यकीय कचरा रस्त्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 10:49 AM2020-07-10T10:49:50+5:302020-07-10T10:50:07+5:30
आठ जुलै रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे हा संपूर्ण कचरा रस्त्यावर व इंदिरा नगरच्या भागात गेला.
बुलडाणा : येथील धाड मार्गावरील कोवीड केअर सेंटरमध्ये मधील वैद्यकीय कचरा हा थेट इंदिरानगर परिसर आणि लगतच्या रस्त्यावर आल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती.
यापूर्वीही सहा मे रोजी येथील कोवीड केअर सेंटरमधील पीपीई कीट व कचरा रस्त्यावर जाळण्यात आल्याचा प्रकार उघड झाला होता. त्यानंतर जवळपास दोन महिन्यानंतर पुन्हा हा प्रकार समोर आला. येथील कोवीड केअर सेंटरच्या बाजूला एक खड्डा खोदून त्यात येथील वैद्यकीय कचरा टाकण्यात येतो. मात्र पालिकेने हा कचरा उचलला नसल्याने तो तेथे तसाच पडून होता.
दरम्यान आठ जुलै रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे हा संपूर्ण कचरा रस्त्यावर व इंदिरा नगरच्या भागात गेला. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. वास्तविक केंद्रीय वन, पर्यावरण व जलवायू परिवर्तन मंत्रालयाने २८ मार्च २०१६ रोजी जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन अधिनियम लागू केला आहे. त्या कायद्यानुसार जैव वैद्यकीय कचऱ्याची सास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. मात्र अलिकडील काळात त्याला खो बसत आहे.
रस्त्यावर तथा नागरी वस्तीच्या परिसरात गेलेला कचरा हा वैद्यकीय कचरा नसून जनरल प्लास्टीक आहे. त्यात पीपीई कीट नाहीत. नागरिकांना या या पासून कुठलाही धोका नाही. हा कचरा पालिकेने नेला नसल्याने तेथे खड्डा खोदण्यात येऊन तो टाकण्यात आला होता.
- डॉ. पी. बी. पंडीत
जिल्हा शल्य चिकित्सक, बुलडाणा