लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : तालुक्यातील घाटबोरी वन परीक्षेत्रामधील कामावर स्थानिक मजुरांना प्राधान्य देण्यात येणार आहे. सोबतच या वन परीक्षेत्रात अवैधरीत्या तोडण्यात आलेली सागवानाची झाडेही जप्त करण्यात आली आहेत. यासंदर्भात ३0 जानेवारीला लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत लगोलग ही कार्यवाही करण्यात आली. घाटबोरी वन परीक्षेत्रामध्ये परजिल्ह्यातून मजूर आणून कामे करून घेण्यात येत होती. त्यामुळे स्थानिक मजुरांना फटका बसून त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. सोबतच परिसरात सागवानाच्या वृक्षांची अवैधरीत्या तोड होत होती. हे मुद्दे घेऊन संबंधित वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वन परीक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सागवानासह इतर आडजात वृक्षांची तोड होत होती. याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत होते. वृक्षतोड करणारा कंत्राटदार आणि घाटबोरी वन परीक्षेत्रातील अधिकार्यांच्या कथीत स्तरावरील हितसंबंधामुळे हा प्रकार होत होता, अशी ओरड होते. गेल्या आठवड्यात वरवंड, पाथर्डी शिवारामध्ये सागवानच्या झाडांची कत्तल करण्यात आली होती. ही झाडे कोणी तोडली, यासंदर्भात वन विभागालाच माहिती नव्हती. विचारणा केल्यानंतरही अधिकार्यांकडून सर्मपक उत्तर दिले जात नव्हते. सोबतच या परीक्षेत्रामध्ये वन विभागांतर्गत विविध कामे सुरू होती. या कामावर परजिल्ह्यातून मजूर आणले जात होते, त्यामुळे स्थानिक मजुरांची उपासमार होत होती. या प्रमुख मुद्यावर लक्ष वेधण्यात आले होते. दरम्यान, वृत्ताची दखल घेत वन विभागाने ४४९ घनफूट सागवानाची झाडे जप्त केली आहेत. ही झाडे कोणी व का तोडली, याची माहिती मात्र अद्यापही वन विभागाकडे नाही. आरोपींचा शोध सध्या घेण्यात येत असल्याचे वन विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. सोबतच स्थानिक मजुरांनाच कामे देण्याचा प्रयत्न वन विभाग करेल, अशी माहितीही यासंदर्भात विचारणा केली असता सहायक वन संरक्षक एल. एम. पाटील यांनी दिली.दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात अन्यत्रही अशाच पद्धतीने वृक्षतोड होत असून, त्यावरही वन विभागाने अंकुश लावण्याची गरज आहे.देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा परिसरातही मध्यंतरी अशाच पद्धतीने वृक्षतोड होत होती. हे प्रकार वाढल्याने वन विभागाच्या अखत्यारितील जंगलाची घनता कमी झाली आहे. ती वाढविण्यावर जोर द्यावा लागणार आहे. वन विभागाने त्यासाठी आता प्रभावी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
सव्वा लाख वृक्ष लागवडवाढती वृक्षतोड पाहता शासनाने वन परीक्षेत्रामध्ये झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यासंदर्भात घाटबोरी वन परीक्षेत्रामध्ये विविध जातीची एक लाख २0 हजार झाडे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी खड्डे खोदण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. या कामावर जवळपास एक कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
वरवंड आणि पाथर्डी शिवारातील तोडलेली सागवानाची झाडे जप्त करण्यात आली असून, आरोपीचा शोध सुरू आहे. यापुढे स्थानिक मजुरांकडूनच कामे करून घेण्यास प्राधान्य दिले जाईल. - एल. एम. पाटील, सहायक वन संरक्षक, मेहकर.