मेहकर : आमदार संजय रायमुलकर यांच्या स्थानिक विकास निधीतून अंदाजे दहा लाख रुपये खर्चुन मेहकर ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर खरेदीसाठी जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे.
सध्या कोविड परिस्थिती सर्वत्र गंभीर आहे. मेहकर मतदारसंघात सुद्ध रोज रुग्ण माेठ्या प्रमाणात वाढत आहेत. स्थानिक ग्रामीण रुग्णालयात कोविड उपचार व प्रतिबंधासाठी शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांनी स्थानिक विकास निधीतून व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी निधीस मान्यता देण्यासाठी प्रस्ताव पाठविला होता. त्यास जिल्हाधिकारी, बुलडाणा यांनी मान्यता दिली आहे. अंदाजे दहा लाख रुपयांचे व्हेंटिलेटर मेहकर ग्रामीण रुग्णालयास मिळणार आहे. मेहकरमध्ये ग्रामीण रुग्णालयात ग्रामीण तसेच आदिवासी बहुल भागातून मोठ्या संख्येने नागरिक उपचारासाठी येतात. येथे व्हेंटिलेटरची सुविधा नसल्याने रुग्णांना ही सोय मिळत नव्हती. ही आवश्यकता ओळखून आ. संजय रायमुलकर यांनी व्हेंटिलेटर खरेदीचा निर्णय घेतला. याआधी सुद्धा कोविड उपचार व प्रतिबंधासाठी आ. संजय रायमुलकर यांनी मागील वर्षी रॅपिड टेस्ट कीट खरेदीसाठी दहा लाख रुपये, तर ५० लाख रुपयांचा निधी दिला होता.