ग्रामीण रुग्णालयातील लाखो रुपयांचे यंत्र धूळ खात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:50 AM2017-09-26T00:50:44+5:302017-09-26T00:51:24+5:30
देऊळगावमही: येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना विविध तपासण्यांसाठी शहराच्या ठिकाणी किंवा खासगी डॉक्टरकडे पाठविण्यात येते; मात्र रुग्णालयातच लाखो रुपयांचे यंत्र बंद खोलीत धूळ खात पडले असल्याचे लोकमतने सोमवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनदरम्यान निदर्शनास आले. तसेच रुग्णालयातच कमालीची अस्वच्छता आढळून आली.
प्रकाश साकला।
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊळगावमही: येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना विविध तपासण्यांसाठी शहराच्या ठिकाणी किंवा खासगी डॉक्टरकडे पाठविण्यात येते; मात्र रुग्णालयातच लाखो रुपयांचे यंत्र बंद खोलीत धूळ खात पडले असल्याचे लोकमतने सोमवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनदरम्यान निदर्शनास आले. तसेच रुग्णालयातच कमालीची अस्वच्छता आढळून आली.
येथील ग्रामीण रुग्णालयात लाखो रुपयांचे यंत्र उपलब्ध असल्यावरही त्याचा कोणताही वापर न करता रुग्णांची तपासणी करण्यात येत नाही. परिणामी रुग्णांना खासगी डॉक्टरकडे जावे लागते. देऊळगाव राजा तालुक्यातील सर्वात मोठे समजले जाणारे ३0 खाटांचे शासकीय ग्रामीण रुग्णालय सद्यस्थितीत स्वच्छतेअभावी सलाइनवर असून, कामचुकार कर्मचार्यांच्या मनमानी कारभारामुळे रुग्णालयात घाणीचे साम्राज्य पसरले असून, परिसरात मोठय़ा प्रमाणात दुर्गंधी येत आहे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक अशा कामचुकार कर्मचार्यांवर कुठल्याच प्रकारची कार्यवाही करत नसून, त्यांचा परिणामी रुग्णालयात येणार्या रुग्णांच्या आरोग्यावर होत आहे.
रुग्णालयाच्या परिसरात असलेले स्वच्छतागृह गेल्या कित्येक दिवसांपासून साफ केले आहे. तसेच प्रसृतिगृहात कुठल्याच प्रकारची साफसफाई होत नाही. रुग्णालयाच्या परिसरात कचरा साचलेला आहे. तसेच येथील काही कर्मचारी आपले काम खासगी व्यक्तीकडून करून घेतात व कर्तव्यावर गैरहजर राहत असल्याचे प्रकार निदर्शनास येत आहे.
कर्मचारी रुग्णालयात कुठल्याच प्रकाराची वेळ पाळत नाहीत. शासनाने रुग्णालयात ‘थंब मशीन’ बसवलेली असून, त्याचाही वापर कर्मचारी करीत नाहीत. रुग्णालयात महत्त्वाचा औषध साठा उपलब्ध नाही.
कर्मचार्यांवर कुठल्याच प्रकारचा वचक वैद्यकीय अधीक्षकांचा राहिलेला नाही. या सर्व प्रकारासंदर्भात येथिल भाजपा शहर अध्यक्ष कैलास राऊत यांनी वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन दिले असून, येत्या १५ दिवसात सर्व समस्या मार्गी लावा अन्यथा जनआंदोलन उभारू, असा इशारा त्यांनी दिला.
३0 खाटांच्या रुग्णालयात २१ खाटा
ग्रामीण रुग्णालयात ३0 खाटांना मंजुरी आहे; मात्र रुग्णालयात केवळ २१ खाटाच आहेत. येथे दाखल झालेल्या रुग्णांना अनेकदा जागा नसल्यामुळे दाखल होण्याकरिता देऊळगाव राजा किंवा बुलडाण्याला पाठविण्यात येते.
रुग्णालयातील साफसफाई संदर्भात कर्मचार्यांना आदेश दिले आहेत. लवकरच सर्व समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. रुग्णालयात पुरेसा औषध साठा नसून, रुग्णसेवेत अडचण निर्माण होत आहे तसेच काही अधिकारी व कर्मचारी यांची पदे रिक्त असून, लवकरात लवकर मा. उपसंचालकांनी पदे भरावी, अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली.
- डॉ.जे.पी. ताठे, वैद्यकीय अधीक्षक