- नवीन मोदे लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव बढे : सत्यमेव जयते वॉटर स्पर्धेत गावकऱ्यांच्या एकीतून प्रचंड काम करणाºया मोताळा तालुर्कयातील पोफळी ग्रामस्थांनी यावर्षी वृक्ष लागवडीचा मियावाकी पॅटर्न अवलंबिला आहे. जलदगतीने घनदाट जंगल निर्मितीची ही जपानची पध्दत आहे. जिल्ह्यातील पहिला व देशातील ३८ वा प्रयोग आहे.पाणीटंचाई व दुष्काळाला कायमस्वरुपी हद्दपार करण्यासाठी पोफळीवासी एकत्र आले. वॉटरकप स्पर्धेत विदर्भातील सर्वात जास्त टार्गेट घेऊन त्यापेक्षा अधिक काम करण्याचा भीम पराक्रम त्यांनी केला. पहिल्याच पावसात परिसर पाणीदार झाला. २६ जून रोजी पहिला पाऊस पडताच वृक्ष लागवडीचा मियावाली पॅटर्न राबविण्यात आला. मागील तीन महिन्यांपासून तयारी सुरु होती. गावानजिकच्या सुमारे साडेतीन गुंठा जागेत विविध प्रकारच्या तीन हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले. सामाजिक वनीकरणचे उपसंचालक संजय पार्डीकर, वनाधिकारी पडोळकर उपस्थित होते. पोफळीचे सुपुत्र नीलेश व्यवहारे यांनी स्वखर्चाने हा उपक्रम राबविला. पारंपारिक पध्दतीने जंगल निर्मितीसाठी सुमारे २०० वर्षांचा कालावधी लागतो. परंतू मियावली पध्दतीने केवळ २० वर्षात घनदाट जंगल तयार होऊ शकते. या पध्दतीचा ७० ते ८० च्या दशकात जपानमध्ये उदय व प्रसार झाला. वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. अकिरा मियावाली यांनी या पॅटर्नचे संशोधन केले. जागतिक हवामान बदलास सामोरे जाण्यासाठी मियावाली जंगलनिर्मिती हा उत्कृष्ट पर्याय आहे.प्रयोगातून येणार सकारात्मक परिणाम पोफळीवासियांनी हा अनोखा प्रयोग राबविण्याचा निर्णय घेतला. उद्योजक नीलेश व्यवहारे, अॅड. राहुल व्यवहारे, पं. स. सदस्य रावसाहेब देशमुख, प्रताप देशमुख, उपसरपंच विशाल व्यवहारे, प्रसन्ना देशमुख, योगेश वसतकार यांनी पुढाकार घेतला. पाणी फाऊंडेशन, कृषी विभाग, वनविभागाचे मार्गदर्शन मिळाले. हा प्रयोग यशस्वी झाल्यास जिल्ह्यात सकारात्मक परिणाम दिसतील. पारंपारिक वृक्ष लागवड पध्दतीऐवजी अशा प्रकारच्या नवीन पध्दतीकडे वळण्याची गरज आहे.
पोफळीत वृक्ष लागवडीचा ‘मियावाकी’ पॅटर्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 2:40 PM