‘अस्त्र, शस्त्र आणि फौज’ बाबतचे वक्तव्य आ. गायकवाडांनी घेतले मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 06:04 PM2021-07-08T18:04:08+5:302021-07-08T18:04:18+5:30
MLA Sanjay Gaikwad took back his Statement : अस्त्र, शस्त्र आणि दहा हजारांची फौज आणण्यासंदर्भातील केलेले वक्तव्य आपण मागे घेत असल्याचे बुलडाण्याचे शिवसेनेेचे आ. संजय गायकवाड यांनी ८ जुलै रोजी स्पष्ट केले.
बुलडाणा: गेल्या १५ दिवसापूर्वी खामगाव तालुक्यातील चितोडा गावात दोन कुटुंबामध्ये झालेल्या वादानंतर गावात झालेल्या तणावपूर्ण वातावरणानंतर अस्त्र, शस्त्र आणि दहा हजारांची फौज आणण्यासंदर्भातील केलेले वक्तव्य आपण मागे घेत असल्याचे बुलडाण्याचे शिवसेनेेचे आ. संजय गायकवाड यांनी ८ जुलै रोजी स्पष्ट केले. दरम्यान खोट्या ॲक्ट्रासिटीसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर आपण ठाम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.आ. संजय गायकवाड यांच्या मातोश्री या जनसंपर्क कार्यालयावर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी उपरोक्त माहिती दिली. सोबतच खोट्या गुन्ह्याच्या माध्यमातून लोकांची आर्थिक पिवळणूक होत असले तर ते चुकीचे आहे. त्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर आपण आजही ठाम असल्याचे त्यांनी सांगितले.
खामगाव तालुक्यातील चितोडा येथे दोन कुटुंबामध्ये वाद झाला होता. त्याला दोन समाजामधील वादाचे स्वरुप प्राप्त झाले होते. त्यामुळे चितोडा येथे तणावपूर्ण वातावरण मधल्या काळात निर्माण झाले होते. त्यावेळी संबंधित गावास भेट देऊन घटनेचे संदर्भ घेत आ. संजय गायकवाड यांनी अस्त्र, शस्त्र आणि १० हजाराची फौज आणू असे वक्तव्य केले होते. त्यामुळे हा वाद चिघळण्याची भीती होती. मात्र दुसरीकडे ग्रामस्थांनी अनुषंगीक प्रकरण सामज्यांने घेऊन गावाच्या भल्यासाठी वाद मिटविण्याची भूमिका घेतल्यामुळे आपण आपले उपरोक्त वक्तव्य मागे घेत असल्याचे आ. गायकवाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले. आपण भावनेच्या भरात ते वक्तव्य केले होते असे ही ते म्हणाले.
मात्र खोटे गुन्हे दाखल करून लोकांची आर्थिक पिळवणूक होत असले तर त्या विरोधात आपण आहोत. त्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर आजही ठाम असल्याचे ते म्हणाले. मुळात चितोडा येथील वाद हा दोन कुटुंबामधील वाद होता. त्याला दोन समाजातील वादाचे स्वरुप दिल्या गेले असेही ते म्हणाले. आपण कोणत्या समाजाच्या विरोधात नसून अशा गुंडप्रवृत्तीच्या विरोधात असल्याचे ते म्हणाले. आपल्यावर आरोप करणाऱ्यांनी असे कृत्य करणाऱ्यांची पार्श्वभूमीही आधी तपासली पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले.