‘मॉडेल स्टेशन’चा दर्जा कागदावरच
By admin | Published: May 25, 2015 02:32 AM2015-05-25T02:32:32+5:302015-05-25T02:32:32+5:30
मलकापूर रेल्वे स्थानकात सुविधांचा अभाव; निधीअभावी रखडला आराखडा.
मनोज पाटील / मलकापूर : विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर रेल्वे स्थानकावरुन घाटावरील प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. या स्टेशनवर जवळपास २९ गाड्यांचे थांबे असून येथे मॉडेल स्टेशनचा दर्जा प्राप्त झालेला आहे. असे असलेतरी या स्थानकावर आजही प्रवाशांना आवश्यक असलेल्या सोयीसुविधांचा अभाव असून या स्थानकाचा केवळ निधी अभावी अभिप्रेत असा विकास रखडलेला आहे. सन २00४ मध्ये जिल्ह्याचे तत्कालीन खासदार आनंदराव अडसूळ व मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती यांचे संयुक्त प्रयत्नातून मलकापूर रेल्वे स्थानकास मॉडेल स्टेशनचा दर्जा मिळावा हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे दाखल करण्यात आला होता. तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री नितेशकुमार यांनी सदर प्रस्ताव मंजूर केला. मात्र नंतरच्या काळात केंद्रात सत्ता पालट झाल्याने या मॉडेल स्टेशनचा प्रस्ताव थंडबस्त्यात पडला. याप्रकरणी आ.संचेती व जिल्हा प्रवासी संघाने केंद्र शासन तसेच रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवल्याने या प्रस्तावास पुन्हा नव्याने २३ जुलै २0१२ रोजी मंजुरात मिळाली. आजमितीस या रेल्वे स्थानकाला मॉडेल स्टेशनचा दर्जा मिळून ३ वर्षाचा कालावधी लोटला असलातरी या स्थानकाला अद्यापही मॉडेल स्टेशनचे स्वरुप प्राप्त झाले नाही. जिल्हा प्रवासी सेवा संघ व लोकप्रतिनिधींच्या पुढाकारातून या स्थानकावर अनेक रेल्वे गाड्यांचे थांबे व प्रवाशांकरिता सोयी उपलब्ध झाल्यात. पिण्याचे पाणी, शौचालये, बाथरुम आदी सुविधा या स्थानकावर असूनही या सुविधांचा दर्जा मात्र खालावलेला आहे. रेल्वे स्थानकाबाहेर बेशिस्तीत असलेल्या ऑटोचालकांचा प्रवाशांना होणारा त्रास पाहता स्थानकासमोरील शासनाची मोकळी जागा रेल्वे प्रशासनाने शासनाकडे मागितली होती. राज्य शासनानेही या मागणीस ७ ते ८ वर्षाआधीच हिरवी झेंडी दिली. अशाप्रकारे या मॉडेल रेल्वेस्थानकाचे कवित्व सुरु असून हे कवित्व केवळ निधी अभावीच होत आहे. या बाबीकडे केंद्र शासन व रेल्वे प्रशासनाने तात्काळ लक्ष दिले तरच या स्थानकाला खर्याअर्थी मॉडेल स्टेशनचे स्वरुप प्राप्त होवू शकते. यासाठी आता पाठपुरावा हवा आहे.