लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव सराई (बुलडाणा): भींत अंगावर पडल्याने मध्यप्रदेशातील मायलेकीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना चिखली तालुक्यातील सैलानी येथे ११ आॅगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली. मनोरुग्णावर उपचार करण्यासाठी मध्यप्रदेशातील माय-लेकी सैलानी येथे मुक्कामी होत्या. सुगवंती मनोज काजळे (५५) व कविता मनोज काजळे (१८) असे मृतकांची नावे आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.मध्यप्रदेशातील खांडवा बोटी येथील सुगवंती काजळे व कविता काजळे या माय-लेकी चिखली तालुक्यातील सैलानी येथे सादुखा जिन्ना खा यांच्या टिनपत्राच्या खोलीत भाड्याने राहत होत्या. सोमवारी परिसरात पाऊस झाल्याने हे टीनपत्राचे घर कोसळले विटा मातीची भींत अंगावर पडल्याने माय-लेकीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना निदर्शनास येताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोन्ही माय-लेकींना मातीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढले. परंतू तोपर्यंत दोघींचाही मृत्यू झाला होता. या दुर्घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
रायपूर पोलिसांकडून पाहणीसैलानी येथे भींत पडून मायलेकींचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुभास दुधाळ, एएसआय यशवंत तायडे, शेख कय्यूम, विजय पैठणे, पोलीस पाटील रामेश्वर गवते यांनी घटनास्थळावर धाव घेऊन पाहणी केली. तसेच पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. या प्रकरणी रायपूर पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे.