विजेच्या धक्क्याने दोन उपवर मुलांसह आई-वडीलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 10:24 AM2020-05-31T10:24:55+5:302020-05-31T10:28:31+5:30
वीजेचा शॉक लागल्याने एका कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: वीजेचा शॉक लागल्याने एका कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. या घटनेत आई-वडीलासह दोन उपवरांचा लग्नाच्या आठ दिवसांआधीच मृत्यू झाला. त्यामुळे खामगाव शहरात खळबळ उडाली आहे.
सजनपुरी परिसरातील आनंद नगर, अक्सा कॉलनीत भुरू घासी पटेल (५४) यांच्या नवीन वास्तूत इलेक्ट्रिक फिटींगचे काम सुरू होते. त्यावेळी पटेल यांच्या पत्नी साजेदा बी भुरू पटेल (४८) यांना विद्युत प्रवाह असलेल्या तारांचा स्पर्श झाला. त्यांना वाचविण्यासाठी पती भुरा पटेल धावले; मात्र, त्यांनाही विद्युत शॉक लागला. आरडा-ओरड ऐकून त्यांची दोन्ही मुले जावेद भुरा पटेल(२२) आणि जाकीर भुरा पटेल(२०) आई-वडिलांच्या दिशेने धावले.
त्यांनाही विजेचा धक्का बसल्याने चौघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, एकाच कुटुंबातील चौघांचा एकाचवेळी दुर्देवी मृत्यू झाल्याने विविध संशय देखील व्यक्त होत होते. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील घटनास्थळी पोहोचले. त्यांच्या पाठोपाठ शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे निरीक्षक सुनिल हुड आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचे निरिक्षण केल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी विद्युत शॉक लागल्यानेच चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला. एका दुर्देवी घटनेमुळे चौघांचेही आयुष्य एका क्षणांत संपल्याने अनेकांना आपल्या भावना अनावर झाल्या होत्या.
मोबाईल फोन उचलत नसल्याने परिसरातील एका नागरिकाने त्यांच्या घरी धाव घेतली. त्याने दरवाजा ठोठावल्यानंतरही घरातून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याने घरात डोकावून पाहले असता, घरात अतिशय हृदयद्रावक दृश्य दिसले. हे दृश्य पाहताच त्याने टाहो फोडला. नगरसेवक अ. रशीद अ. लतिफ, माजी नगरसेवक मो. आरीफ पहेलवान आणि परिसरातील नागरिक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले. त्यानंतर शॉकलागून मृत्यूमुखी पडलेल्या चौघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आले.
एकाच कुटुंबातील चौघांचा विद्युत शॉक लागून मृत्यू झाल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर मृतकांच्या नातेवाईकांनी एकच टाहो फोडत त्यांच्या घराच्या दिशेने धाव घेतली. यावेळी महिलांचा आक्रोश हृदपिळवटून टाकणारा असाच होता. बर्डे प्लॉट भागातील त्यांचे नातेवाईक धावतच अक्का कॉलनीत पोहोचत होते. या घटनेत एकाच कुटुंबातील चौघांचा करूण अंत झाल्याने प्रत्येकाच्याच डोळ्याला धारा लागल्या होत्या. घटनेची माहिती भुरा पटेल यांच्या खंडवा येथील विवाहित मुलीला देण्यात आल्यानंतर तिनेही फोनवरच टाहो फोडला.
लग्नापूर्वीच दोघां भावांचा मृत्यू
जावेद भुरा पटेल(२२) याचे लग्न बर्डे प्लॉट खामगाव भागातील एका युवतीशी ७ जून रोजी ठरले होते. तर जाकीर भुरा पटेल (२०) याचे लग्न वाशीम येथील एका युवतीशी ८ जून रोजी ठरले होते. मात्र, शनिवारी घडलेल्या घटनेत दोघांही भावांचा दुर्देवी मृत्यू झाला. दोन्ही भावांचे एक दिवसाआड अवघ्या आठ दिवसांत लग्न असल्याने घरी लग्नाची लगबग सुरू असतानाच अतिशय दुर्देवी प्रसंग अक्का कॉलनीतील पटेल कुटुंबियांवर कोसळला.