स्वच्छ भारत अभियानाला ‘मातृशक्ती’चा हातभार; खामगाव पालिकेचा एकमेव प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:41 PM2018-08-22T12:41:53+5:302018-08-22T12:45:11+5:30
शासनाकडून ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्यात येत असून या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी खामगाव पालिकेने आता ‘मातृशक्ती’ची मदत घेण्यास प्रारंभ केला आहे.
- अनिल गवई
खामगाव: ‘हात फिरे तिथे; ‘लक्ष्मी’ वसे’ या ओळीतून जुन्या-जाणत्यांनी स्वच्छतेचे महत्व सांगितले. स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठीच शासनाकडून ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्यात येत असून या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी खामगाव पालिकेने आता ‘मातृशक्ती’ची मदत घेण्यास प्रारंभ केला आहे. कचरा विलगीकरणाला गती देण्यासाठी कचरा घंटागाडीवर चक्क महिला बचत गटाच्या महिलांना नियुक्ती देण्यात आली. अमरावती विभागातील हा एकमेव प्रयोग असल्याचा दावा पालिकेकडून केल्या जात आहे.
स्वच्छ भारत अभियानातंर्गत राज्यातील सर्वच नगर पालिकांमध्ये घनकचरा व्यवस्थापन करण्यात येत आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालिका प्रशासनाकडून थेट घरातूनच कचरा उचलण्यात येत आहे. यासाठी शहराच्या विविध प्रभागात घंटागाडीही लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे कचरा उचलण्याच्या प्रक्रीयेला गती मिळाली. त्यानंतर त्याही पलिकडे जावून आता पालिकेने जागेवरच कचºयाचे विलगीकरण करण्यास प्रारंभ केला आहे. जागेवर विलगीकरण झालेला कचरा झटपट गोळा करण्यासोबतच घनकचºयाबाबत जनजागृती आणि समुपदेशनासाठी कचरा उचल घंटागाडीवर महिला बचत गटातील महिलांनी नियुक्ती केली आहे. या माध्यमातून शहरातील महिला बचत गटातील काही महिलांना रोजगार देखील मिळाला आहे.
प्रत्येक घंटागाडीवर महिलेची नियुक्ती!
खामगाव शहरातील विविध प्रभागात पालिकेच्यावतीने १८ घंटागाडी वेळापत्रकानुसार फिरतात. घरोघरी फिरून या घंटागाड्या कचरा गोळा करतात. आता या घंटागाड्यांवर महिला बचत गटातील महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे बचत गटातील महिलांना रोजगार प्राप्त झाला असून, कचरा विलगीकरणाच्या प्रक्रीयेला आपसूकच गती प्राप्त होत आहे.
बचत गटाच्या महिलांना पीकेव्हीकडून मार्गदर्शन!
खामगाव येथे कचरा विलगीकरण प्रक्रीयेत सहभाग नोंदविणाºया महिलांसाठी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे. यासाठी खामगाव पालिकेच्यावतीने ‘प्लास्टिक प्रशिक्षण केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात निवड झालेल्या महिलांना अकोला येथे प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहे.
स्वच्छ भारत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी खामगाव पालिकेकडून सुरूवातीपासूनच विविध प्रयोग केल्या जात आहेत. घरोघरी कचला उचल प्रक्रीयेत गतीमानता आणण्यासाठी बचत गटातील महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. खामगाव पालिकेकडून पहिल्यादांच हा प्रयोग करण्यात येत आहे.
- धनंजय बोरीकर, मुख्याधिकारी, न.प.खामगाव.