बुलडाणा : राष्ट्रमाता माँ जिजाऊ आणि झाशीच्या राणीचा जीवनसंग्राम महिलांसाठी प्रेरणादायी आहे. एकविसाव्या शतकातील महिलांमध्ये राष्ट्रमाता माँ जिजाऊ आणि झाशी राणी यांच्यासारखी लढवय्यी वृत्ती आणि चाणाक्ष बुद्धिमत्ता असणे ही काळाची गरज आहे, असे मत आझाद हिंद महिला संघटनेच्या शहराध्यक्ष अलका खांडवे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रमाता माँ जिजाऊ आणि झाशीची राणी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत आझाद हिंद महिला संघटना, झाशी राणी ब्रिगेड, बहुजन महिला संघटना, मातृतीर्थ रणरागिणी संघटना यांच्यातर्फे सलग पाच तासांच्या चर्चासत्राचे आयोजन गुरुवारी (दि. १७) संघटनेच्या संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. त्या द्वितीय समारोपीय चर्चासत्रात बाेलत हाेत्या़
प्रथम सत्राला आझाद हिंद संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष ॲड. सतीशचंद्र रोठे यांच्या अध्यक्षतेत, तर आझाद हिंद शालेय पोषण आहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष लियाकत खान, आझाद हिंद संघटनेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष श्रीकृष्ण भगत, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण कोकाटे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शेख सईद शेख कदीर, पत्रकार अनिल पारवे, माजी सैनिक कैलास मिसाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला. समारोपीय सत्र आझाद हिंद महिला संघटनेच्या प्रदेश संपर्कप्रमुख सुरेखा निकाळजे यांच्या अध्यक्षतेत झाले. यावेळी जिल्हा उपाध्यक्षा वर्षा ताथरकर, अलका खांडवे, शाहीर सिंधुताई अहेर, शाहीर शालिनी सरकटे, निर्मला रोठे, योगिता रोठे, सुमित्रा सोनटक्के, आदींची प्रमुख उपस्थिती हाेती़ आझाद हिंद महिला संघटना, मातृतीर्थ रणरागिणी संघटना, बहुजन महिला संघटना व झाशी राणी ब्रिगेडच्या समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चर्चासत्रात सहभाग घेतला. सामूहिक अभिवादन आणि राष्ट्रगीताने चर्चासत्राचा समारोप करण्यात आला. जिल्हा उपाध्यक्षा वर्षा ताथरकर यांनी संचालन, तर विदर्भ प्रदेशाध्यक्ष श्रीकृष्ण भगत यांनी आभार प्रदर्शन केले.