दिव्यांगांचे बुलडाणा जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 12:40 AM2017-12-04T00:40:22+5:302017-12-04T00:41:09+5:30
दिव्यांगांसंदर्भातील १९९५ च्या कायद्याची अंमलबजावणी करावी, यासह विविध मागण्यांसाठी जागतिक अपंगदिनी अर्थात तीन डिसेंबर रोजी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर ठिय्या देऊन काळा दिवस पाळण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : दिव्यांगांसंदर्भातील १९९५ च्या कायद्याची अंमलबजावणी करावी, यासह विविध मागण्यांसाठी जागतिक अपंगदिनी अर्थात तीन डिसेंबर रोजी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर ठिय्या देऊन काळा दिवस पाळण्यात आला. शासनाच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.
जयस्तंभ चौकातून प्रारंभी संघटनेतर्फे मोर्चा काढण्यात आला. प्रहार जनशक्ती पक्षाचे वैभवराजे मोहिते यांच्या मार्गदर्शनात प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे पश्चिम विदर्भ प्रमुख राणा संजय इंगळे यांच्या नेतृत्वात जयश्री गीते, शिवनारायण पोफळकर, उपजिल्हा प्रमुख नीलेश गुजर, स्वराज भगत, रवी पवार, सागर गुजर, नागेश बाजी, राजेश पुरी, शिवाजी परमेश्वर यांच्यासह दिव्यांग बांधव, भगिनी या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर हा मोर्च जिल्हा परिषदेसमोर धडकला. पोलिसांनी इमारतीत जाण्यास मज्जाव केल्याने ठिय्या आंदोलन केले. जिल्हा समाजकल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी आंदोलकांशी चर्चा केली. अपंग कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्याची मागणीही करण्यात आली.
दोषींवर कारवाई करणार
मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस. यांनी ४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा परिषदेमध्ये दिव्यांगांच्या मुद्यावर बैठक बोलावली आहे. त्या बैठकीस अधिकार्यांना उपस्थित राहण्याचे आदेशही देण्यात आले असून, आंदोलनकर्त्यांना तसे पत्रही दिले आहे. दिव्यांगांच्या मागण्या तत्काळ निकाली काढण्यासंदर्भात दिरंगाई करणार्या अधिकार्यांवर कारवाई करण्याचेही आश्वासन आंदोलकांना देण्यात आल्याने तूर्तास हे आंदोलन मागे घेण्यात आले.