नगर पालिका निवडणूक: ३0९ अर्ज दाखल!
By admin | Published: October 29, 2016 02:47 AM2016-10-29T02:47:32+5:302016-10-29T02:47:32+5:30
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस; युती व आघाडीकडे उमेदवारांचे लक्ष.
बुलडाणा/खामगाव, दि. २८- नगरपालिका निवडणुकीत नशीब आजमाविण्यासाठी जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांमध्ये शुक्रवारी नगराध्यक्ष तसेच नगरसेवकासाठी ३0९ अर्ज दाखल केले.
शनिवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे शुक्रवारी उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी एकच झुंबड उडाली. बुलडाणा नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी ४ जणांनी सहा अर्ज तर नगरसेवकासाठी ७३ अर्ज दाखल करण्यात आले; तसेच देउळगाव राजा येथेही सहा अर्ज दाखल करण्यात आले. घाटाखालील विविध नगरपालिकांमध्ये शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नगरसेवकांसाठी तब्बल २0९ अर्ज दाखल झाले, तर नगराध्यक्षांसाठी खामगाव नगरपालिका वगळता उर्वरित चार पालिकांमध्ये १५ अर्ज दाखल झाले. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीच उमेदवारी अर्ज दाखल करण्याकडे अनेकांचा कल राहणार असल्याचे संकेत आहेत.
घाटाखालील खामगाव नगरपालिकेतील नगराध्यक्षांकरिता शुक्रवारी २0 अर्ज दाखल झाले; मात्र नगराध्यक्षांसाठी एकही अर्ज दाखल झाला नाही. त्याचवेळी नांदुरा नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी सर्वाधिक ५८ अर्ज तर नगराध्यक्षांसाठी ६ अर्ज दाखल झाले. मलकापूर पालिकेत नगरसेवक पदासाठी ६0 तर नगराध्यक्षांसाठी ३ अर्ज दाखल झाले. जळगाव जामोद नगरपालिकेतील निवडणुकीसाठी नगरसेवक पदाचे ४१ तर नगराध्यक्षांसाठी ४ अर्ज तर शेगाव पालिकेत नगरसेवकांसाठी ३0 आणि नगराध्यक्षांसाठी दोन अर्ज दाखल झाले.