लोकमत न्यूज नेटवर्कबीबी : दागिन्यांच्या हव्यासापाेटी चुलत सासूची सुनेने हत्या केल्याची घटना भुमराळा शिवारात १९ सप्टेंबरला उघडकीस आली़ बिबी पाेलिसांनी १२ तासांत आराेपी सुनेला अटक केली आहे़ लोणार तालुक्यातील भुमराळा येथील वृद्ध महिला कासाबाई नारायण चौधरी (६५) ही महिला स्वतः च्या शेतात काम करत हाेती़. यावेळी शेताशेजारी शेत असलेल्या नंदाबाई उद्धव चौधरी हिने सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या मोहापायी वृद्ध महिलेचा गळा दाबून खून केला होता. वृद्ध महिलेचा खून झाल्याचे १९ सप्टेंबरला उघडकीस आले हाेते़. या घटनेची फिर्याद पोलीस स्टेशन बिबी येथे दाखल होताच ठाणेदार एल. डी. तावरे व सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेची माहिती वरिष्ठांना कळवताच जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, पोलीस उपविभागीय अधिकारी विलास यामावार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळिराम गिते यांच्यासह ठसेतज्ज्ञ व श्वानपथकासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांच्या मार्गदर्शनाखाली बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार एल. डी. तावरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जिद्दमवार, शेळके, पोलीस उपनिरीक्षक किसन राठोड, पोलीस उपनिरीक्षक जायभाये , पोलीस अंमलदार मोहम्मद परशुवाले, अरुण सानप,जगदेव टेकाळे, शिवाजी दराडे, यशवंत जैवळ यांनी अवघ्या १२ तासांत खुनाच्या आरोपीस अटक करून घटनेतील मुद्देमाल हस्तगत केला आहे. मृत महिलेचा नातू मधुकर दत्ता मोरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी नंदाबाई उद्धव चौधरी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.या घटनेमुळे गावात खळबळ उडाली हाेती. पाेलिसांनी अवघ्या तासातच आराेपीस अटक केली.
असा लागला शाेध वृद्ध महिलेची हत्या झाल्याचे समाेर येताच रविवारी बिबी पाेलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली हाेती. यावेळी घटनास्थळावर श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले हाेते. श्वान आराेपी महिलेच्या घराजवळ घुटमळत हाेते. आराेपी दुसऱ्या मजल्यावर असल्यामुळे पाेलिसांना संशय आला. गावातही पाेलिसांनी चाैकशी केली असता संशय बळावला. अखेर महिलेची चाैकशी केली असता तिने गुन्हा केल्याची कबुली दिली.