राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेत नागपूरचा दबदबा; १९ वर्षानंतर झाली बुलढाण्यात स्पर्धा
By निलेश जोशी | Published: December 17, 2023 10:31 PM2023-12-17T22:31:08+5:302023-12-17T22:37:55+5:30
२० वर्षाखालील मुलांच्या ८ आणि मुलींच्या ६ किमीच्या धावण्याच्या शर्यतीत सांगलीचा दर्शत घुमरे आणि रत्नागिरीची साक्षी यादव यांनी बाजी मारली
नीलेश जोशी, बुलढाणा : येथे झालेलेल्या राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेत महिला व पुरुषांच्या दहा किमी धावण्याच्या स्पर्धेत नागपूरने वर्चस्व गाजवले. सादाब पठाण आणि रिया तोठारे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. २० वर्षाखालील मुलांच्या ८ आणि मुलींच्या ६ किमीच्या धावण्याच्या शर्यतीत सांगलीचा दर्शत घुमरे आणि रत्नागिरीची साक्षी यादव यांनी बाजी मारली.
महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन, बुलढाणा जिल्हा ॲम्युचर ॲथलेटिक्स असोसिएशन आणि जयमातृभूमी क्रीडा मंडळाच्यावतीने या स्पर्धेचे १७ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. रविवारी सकाळी बुलढाण्याचे आ. संजय गायकवाड, आ. धिरज लिंगाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेला प्रारंभ झाला. यावेळी महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव सतिश उचिल, उपाध्यक्ष राजू प्याटी, संजय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुजा सावळे, बुलढाणा पालिकेचे माजी उपाध्यक्ष विजय जायभाये, बुलढाणा संघटनेचे सचिव गोपालसिंग राजपूत, प्रशिक्षक विजय वानखेडे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बोलातंना आ. संजय गायकवाड यांनी बुलढाणा शहराचा क्रीडा क्षेत्रात नावलौकिक आहे खेळाडूंसाठी पायाभूत सुविधा येथे उपलब्ध करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नरत असून तालुकास्तरावर त्यादृष्टीने क्रीडा संकूल उभारण्यास प्राधान्य आहे. त्याद्वारे शहरी तथा ग्रामीण भागातील खेळाडूंना सुसज्ज मैदान व सुविधा देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
गटनिहाय विजयी खेळाडू
- पुरुषांच्या १० किमी धावण्याच्या शर्यतीत नागपूरचा सादाब पठाण पहिला आला. उत्तम पाटील (कोल्हापूर) द्वितीय तर सैरव तिवारी (नागपूर) तृतिय स्थानी आला.
- महिलांच्या दहा किमी धावण्याच्या शर्यतीत नागपूरचीच रिया तोठारे प्रथम, तेजस्वीन लमकाणे (नागपूर) द्वितीय तर प्रणाली शेगोकार (बुलढाणा) ही तृतीय आली.
- २० वर्षाखालील मुलांच्या ८ किमी धावण्याच्या शर्यतीत सांगलीचा दर्शत घुमरे प्रथम आला. कुमार मादणे (सोलापूर) आणि युवराज वस्के (कोल्हापूर) हे अनुक्रमे प्रथम व द्वितीय आले. याच वयोगटात ६ किमी धावण्याच्या शर्यतीत मुलींमध्ये साक्षी यादाल (रत्नागिरी) ही प्रथम तर मिताली भोयार (नागपूर) ही द्वितीय तर सानिका रुपनार (सांगली) ही तृतीय आली.
- मुलांच्या १८ वर्षा आतील गटात नाशिकचा रोहीत बिन्नर प्रथम आला तर मुलींच्या गटात ४ किमी धावण्याच्या शर्यतीत अहमदनगरची साक्षी भंडारी प्रथम आली.
- १६ वर्षाखालील मुलांच्या गटात २ किमी धावण्याच्या शर्यतीत कार्तिक चव्हाण (अकोला) आणि मुलींमध्ये जान्हवी हिरदुरकर (नागपूर) हे दोघे प्रथम आले.