नांदुरा ( जि. बुलडाणा) : थकीत बिलाची रक्कम काढण्यासाठी कमिशनपोटी मागितलेली दोन लाख ८१ हजार रुपयाची लाच घेताना नांदुरा नगर पालिकेचे मुख्याधिकारी अजितकुमार डोके यांच्यासह लेखापाल तोषणा लोणारे, कर्मचारी राठोड या तिघांना बुलडाणा लाच लुचपत विभाग प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी संध्याकाळी रंगेहाथ पकडले.
नांदुरा शहरामध्ये दलीत वस्तीचे काम काही महिन्यापूर्वी झाले होते. या कामाचे बिल थकीत होते. वारंवार कंत्राटदाराने हे बिल मागण्यासाठी मुख्याधिकारी अजितकुमार डोके यांच्याकडे मागणी केली. मात्र त्यांच्याकडून काही केल्या दाद मिळेना. कमिशनपोटी पैशाची मागणी त्याला होत होती. त्यामुळे कंत्राटदार वैतागून गेला होता. अखेर त्याने ए.सी.बी.कडे तक्रार केली. त्यानुसार ४ जानेवारी रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. कंत्राटदाराकडून पैसे घेतांना नांदुरा मुख्याधिकारी अजितकुमार डोके, लेखापाल तोषणा लोणारे, कर्मचारी राठोड या तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले.
पथकाकडून माहिती देण्यास नकारदुपारी ४.३० वाजता बुलडाणा लाचलुचपत विभागाने नांदुरा नगर पालिकेत कारवाई केली. मात्र माध्यमांना नेमकी काय कारवाई झाली याबाबत माहिती देण्याचे टाळले जात होते. पालिकेच्या पदाधिकाºयांनाही याबाबत कुठलीही माहिती दिली जात नव्हती. बुलडाणा लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयात सुद्धा कोणत्याही प्रकारची माहिती दिल्या जात नव्हती. त्यामुळे नेमके कुणाला वाचविण्याचा प्रयत्न सुरु आहे याबाबत पालिकेत चर्चा सुरु होती.