नववर्षात सरकारला शेतकर्यांसाठी सद्बुद्धी येवो - तुपकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 01:32 AM2018-01-01T01:32:33+5:302018-01-01T01:34:24+5:30
२0१८ या नववर्षात तरी शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्याची या सरकारला आई भवानी सद्बद्धी देवो, असे साकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी कार्यकर्त्यांसह जगदंबा देवीच्या चरणी घातले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: सरकारचे शेतकरीविरोधी धोरण, सातत्याने होत असलेली निसर्गाची अवकृपा, सोयाबीनचे पडलेले भाव, कापसावर पडलेली बोंडअळी यामध्ये राज्यातील शेतकरी भरडला गेला. अशावेळी सरकारने या नडलेल्या शेतकर्यांना मदतीचा हात देणे अपेक्षित होते; मात्र सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने शेतकर्यांना वार्यावर सोडले. परिणामी शेतकर्यांच्या आत्महत्या थांबण्याऐवजी वाढत आहेत. २0१८ या नववर्षात तरी शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्याची या सरकारला आई भवानी सद्बद्धी देवो, असे साकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी कार्यकर्त्यांसह जगदंबा देवीच्या चरणी घातले.
२0१७ या सरत्या वर्षात शेवटच्या दिवशी ३१ डिसेंबर रोजी दुपारी १२ वा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात बुलडाणा शहरवासीयांचे आराध्य दैवत आई जगदंबा देवी मंदिरात जाऊन शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी या सरकारला सद्बुद्धी देवो यासाठी देवीच्या चरणी साकडे घालण्यात आले. यावेळी स्वाभिमानीचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. यावेळी रविकांत तुपकर म्हणाले की, मागील चार वर्षांपासून सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी अर्थिक अडचणीत सापडला आहे. कापूस व सोयाबीनचे नगदी पीक बुडाल्याने शेतकरी त्रस्त आहे. सोयाबीन कशीबशी आली; मात्र भाव पडल्याने शेतकर्यांच्या हातावर काहीच पडले नाही. कपाशीवर यावर्षी गुलाबी बोंडअळी पडल्यामुळे कपाशीचे पीक पूर्णत: गेले. एकरी दीड ते दोन क्विंटलसुद्धा कापूस झाला नाही. अनेक शेतकर्यांनी शेतीतील कपाशी उपटून फेकली. सरकारने कापूस उत्पादक शेतकर्यांच्या कपाशीचे पंचनामे केले. लवकरच नुकसान भरपाई देऊ, असे आश्वासन दिले; मात्र सरकारचे हे आश्वासन फोल ठरले. केंद्रात व राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारकडून शेतकर्यांना अपेक्षा होत्या; मात्र मागील चार वर्षात शेतकरी हिताचा एकही निर्णय घेतला नाही. परिणामी शेतकर्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. मागील चार वर्षात शेतकर्यांसा काहीही न करणार्या या सरकारला पुढील २0१८ या वर्षात तरी शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आई जगदंबा चांगली बुद्धी देवो यासाठी शेतकर्यांसह देवीच्या चरणी साकडे घालावे लागत असल्याचे रविकांत तुपकर यावेळी म्हणाले. यापुढे शेतकर्यांसाठी रस्त्यावरची लढाई अधिक तीव्र करू, असा इशारा यावेळी त्यांनी दिला. दरम्यान, शेतकर्यांची संपूर्ण कर्जमुक्ती तातडीने मिळावी, सोयाबीन व कापसाला हमीभाव मिळावा, सरकारने आयात निर्यातीच्या धोरणात बदल करावा, पाम तेलावरील आयात शुल्क वाढवावे, सोयाबीन व कापुस उत्पादकांना १00 टक्के नुकसान भरपाई तातडीने द्यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे पश्चिम विदर्भ प्रमुख राणा चंदन, जिल्हाध्यक्ष पवन देशमुख, शेख. रफीक शेख. करीम, पं.स. सदस्य नंदिनी कल्याणकर, प्रदीप शेळके, कडुबा मोरे, सैयद वशीम, अनिल मिरगे पाटील, अमोल मोरे, दत्ता जेऊघाले, गोटू जेऊघाले, शैलेश कल्याणकर, गजानन पवार, चंद्रकांत हिवाळे, स्वप्निल जाधव, अमोल जाधव, सागर दुतोंडे, संदीप नवले यांच्यासह शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.