Online Education : अभ्यासासाठी आणखी नऊ 'चॅनल' सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 12:51 PM2020-07-08T12:51:10+5:302020-07-08T12:51:29+5:30
आॅनलाइन शिक्षणासाठी तीन चॅनल सुरू करण्यात आले असून, डी. डी. सह्याद्री या चॅनलचाही आधार घेण्यात येणार आहे.
- ब्रम्हानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : ‘शाळा बंद शिक्षण’ ही अभ्यासमाला राज्यभर सुरू करण्यात आली आहे. आॅनलाइन शिक्षणासाठी तीन चॅनल सुरू करण्यात आले असून, डी. डी. सह्याद्री या चॅनलचाही आधार घेण्यात येणार आहे. पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमासाठी आणखी नऊ चॅनल नव्याने सुरू करण्याच्या हालचाली शिक्षण विभागाच्या सुरू आहेत.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याला पालकांसह शैक्षणिक संस्था, शाळा व्यवस्थापन समितीकडून नकार दर्शविण्यात येत आहे. परंतू शाळा सुरू झाल्या नाही, तरी शैक्षणिक सत्र सुरू करण्याच्या अनुषगांने आॅनलाइन शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. ०५ जुलै २०२० रोजी राज्यातील इयत्ता १० वी मराठी माध्यम, इयत्ता १० वी इंग्रजी माध्यम व इयत्ता १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी एका खासगी कंपनीकडून टी.व्ही.वर स्वतंत्र ३ ज्ञानगंगा शैक्षणिक चॅनेलचे उद्घघाटन शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या टी.व्ही. वरील हे चॅनल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचे मोबाइल क्रमांक व इंटरनेट सुविधा आवश्यक आहे. अभ्यासाचे रेडीओ कार्यक्रम ऐकण्यासाठी स्मार्ट फोन व इंटरनेट सुविधा आवश्यक आहे. या तीन चॅनलच्या माध्यमातून दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे आॅनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. त्यात आता आणखी वाढ करण्यात येणार असून पहिली ते बारावीच्या सर्व वर्गांसाठी नऊ चॅनल लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.
प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र चॅनल
सध्या तीन चॅनलद्वारे दहावी व बरावीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. आता नव्याने नऊ चॅनल सुरू करून प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र चॅनल राहणार आहे. पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व वर्गांचा अभ्यास स्वतंत्र चॅनलवरून सुरू होणार आहे. येणाऱ्या नऊ चॅनलमध्ये इयत्ता दहावी उर्दू माध्यम, नववी मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यम, इयत्ता आठवी मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यम, इयत्ता सातवी मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यम, इयत्ता सहावी मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यम, इयत्ता तिसरी व चौथी एकत्र मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यमांचा अभ्यास उपलब्ध होणार आहे.
सर्व विषयांचे ई- साहित्य होणार लवकरच उपलब्ध
अभ्यासाठी सद्यस्थितीत एका खासगी कंपनीची टीव्हीची सुविधा केवळ त्या कंपनीचे सिमकार्ड धारकांसाठी उपलब्ध आहे; परंतू काही दिवसातच सर्व इयत्तांचे, सर्व विषयांचे ई साहित्य यू ट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व स्मार्ट मोबाईल धारकांना उपलब्ध होणार आहे. सर्व माध्यमांचे व सर्व विषयांचे ई साहित्य लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
स्थानिक केबलला डावलले?
सुरूवातीला स्थानिक केबलचा आधार घेऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक व्हिडीओ दाखवण्यात येणार होते. मात्र स्थानिक केबलच्या ऐवजी आता दुसºया खासगी कपंनीकडून हे चॅनल सुरू केले जाणार आहे. डी. डी. सह्याद्री चॅनलवरूनही शैक्षणिक कार्यक्रम प्रवासीत केले जाणार आहे. चार-चार तासाचे अभ्यासाचे व्हिडीओ या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे.
दहावी व बारावीच्या अभ्यासासाठी तीन चॅनल सुरू करण्यात आले आहेत. लवकरच नऊ चॅनलद्वारे अभ्यास सुरू करण्यात येणार आहे. डी. डी. सह्याद्रीवरूनही शैक्षणिक क्रार्यक्रमाचे व्हिडीओ प्रसारीत होतील.
-एजाज खान,
प्राथमिक, शिक्षणाधिकारी,
बुलडाणा.