घनकचरा व्यवस्थापनासाठी ९ चारचाकी घंटागाड्या दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 03:53 PM2019-12-10T15:53:37+5:302019-12-10T15:55:48+5:30
आता ९ चारचाकी घंटागाडी नव्याने दाखल झाल्या असून उर्वरित ११ गाड्याही लवकरच दाखल होणार असल्याचे पालिका सुत्रांनी सांगितले.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी नव्याने ९ घंटागाडी खामगावात दाखल झाल्या आहेत. मात्र, आधीच्याच ३३ तीनचाकी घंटागाडी खामगाव पालिकेच्या आवारात गत सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून उभ्या आहेत. त्यामुळे शहरातील घन कचरा व्यवस्थापनाला गती मिळणार तरी कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे. आणखी ११ चारचाकी घंटागाडी दाखल होणार आहेत.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रत्येक शहर स्वच्छ करण्यावर शासनाचा भर आहे. यासाठी नानाविध प्रयत्न केल्या जात आहे. असे असले, तरी घनकचऱ्याचा प्रश्न सोडविता- सोडविता मोठमोठ्या शहरांच्या नाकीनऊ आले आहेत. कचरा प्रकरणांवरून अनेक मोठ्या शहरांमध्ये रणकंदन माजल्याची उदाहरणेही ताजी आहेत. दररोज निर्माण होणाºया सुक्या व ओल्या कचºयाची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे यावर प्रभावी उपाययोजनांसाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून कचºयाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या अनुषंगाने प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतुद शासनाच्या वतीने करण्यात येत आहे. याअंतर्गत कोणत्या शहराला किती निधीची गरज आहे, हे ठरविण्यासाठी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याचे काम शासनाकडून मार्स प्लानिंग अॅन्ड इंजिनिअरिंग सिस्टीम प्रा.लि. या कंपनीला देण्यात आले होते. याकंपनीने शहरातील घन कचºयाच्या व्यवस्थापनासाठी ५३ गाड्या प्रस्तावित केल्या होत्या. यामध्ये ३३ तीन चाकी तर २० चारचाकी गाड्यांचा समावेश होता. यापैकी तीनचाकी गाड्या सहामहिन्यांपूर्वीच दाखल झाल्या आहेत. तर आता ९ चारचाकी घंटागाडी नव्याने दाखल झाल्या असून उर्वरित ११ गाड्याही लवकरच दाखल होणार असल्याचे पालिका सुत्रांनी सांगितले.
घंटागाड्यांमध्ये कचरा विलगीकरणाची सोय!
डीपीआरनुसार शहरात दररोज निर्माण होणारा ओला तसेच सुका कचरा उचलण्यासाठी ५३ नव्या गाड्या खरेदी करण्याचे प्रयोजन केले होते. यात २० टिप्पर तर ३३ छोट्या घंटा गाड्यांचा समावेश आहे. या सर्वच घंटागाड्यांमध्ये कचरा विलगीकरणाची सोय असलेल्या यामधील काही गाड्या राहणार आहेत.
निविदा प्रक्रीया अंतिम टप्यात!
खामगाव पालिकेतील ३३ तीनचाकी आणि २० चारचाकी घंटागांड्यावर ५३ चालक आणि ५३ हेल्पर तसेच या गाड्यांची देखभाल दुरस्तीसाठी निविदा प्रक्रीया अंतिम टप्यात आहे. स्वच्छ भारत अभियानातंर्गत या निविदा प्रक्रीयेला मूर्त रूप देण्यात आले आहे.