ना अपघाताची भीती, ना दंडाची; दुचाकी चालविताना मोबाइलवर बोलणारे वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:52 AM2021-01-08T05:52:15+5:302021-01-08T05:52:15+5:30
जिवापेक्षा मोबाइलवरील संभाषणाला प्राधान्य देत वाहन चालविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात २०१९ या वर्षात वाहन चालविताना मोबाइल वापरणाऱ्या ...
जिवापेक्षा मोबाइलवरील संभाषणाला प्राधान्य देत वाहन चालविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात २०१९ या वर्षात वाहन चालविताना मोबाइल वापरणाऱ्या दोन लाख ६६ हजार वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. वाहन चालविताना मोबाइल वापरण्यामुळे एकूण १०० अपघात झाले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातही दुचाकी चालवताना मोबाइलवर बोलणाऱ्यांमुळे अनेक अपघात घडले आहेत. त्यामुळे आता अशा वाहनधारकांविरोधात कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असे वाहनधारक सुसाट वेगाने जात आहेत. ज्याठिकाणी वाहतूक पोलीस नाहीत, अशाठिकाणी निष्काळजीपणा अधिक दिसून येतो. त्यामुळे हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.
दुचाकी, चारचाकी व मोठ्या वाहनांचे अनेक चालकही सर्रास वाहन चालविताना मोबाइलवर बोलताना आढळतात. पोलिसांकडून कारवाई झाल्यानंतरही पुन्हा ती चूक करण्याचा प्रकार ते करतातच. जिल्ह्यात २०१९ पेक्षा २०२० मध्ये वाहनधारकांना मोबाइल वापरत वाहन चालविल्याबद्दल मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे. दंडाची रक्कम आता वाढविण्यात आली असली तरी असे गुन्हे करण्याच्या प्रमाणावर अद्याप आळा बसलेला नाही. त्यामुळे वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.
मोबाइलवर बोलणाऱ्यांना २०० रुपये दंड
दुचाकी चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्यांवर २०० रुपये दंड करण्यात येतो. हाच गुन्हा पुन्हा केल्यास दंडाची रक्कम वाढते. परंतु कारवाई करण्यात येत नसल्याने अनेक दुचाकी चालक वाहतूक पोलिसांच्या समोरून मोबाइलवर बोलत दुचाकी चालविताना आढळून आले आहेत.
वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे स्वत:बरोबरच दुसऱ्यालाही धोका पोहचू शकतो. वाहनधारकांनी याबाबत अधिक काळजी घ्यावी. मोबाइलवर बोलत वाहन चालविताना आढळून आल्यास पोलिसांमार्फत तातडीने कारवाई करण्यात येते. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे सत्र सुरूच आहे.
- एन.एम. परदेशी, वाहतूक पोलीस अधिकारी