खामगाव-जालना रेल्वेमार्गाचा साधा उल्लेखही नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:38 AM2021-08-19T04:38:17+5:302021-08-19T04:38:17+5:30
विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा एकमेव मार्ग ठरणारा आहे. हा रेल्वेमार्ग पूर्णत्वास गेल्यास जिल्ह्याच्या विकासास मोठा हातभार लागेल; मात्र या ...
विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा एकमेव मार्ग ठरणारा आहे. हा रेल्वेमार्ग पूर्णत्वास गेल्यास जिल्ह्याच्या विकासास मोठा हातभार लागेल; मात्र या रेल्वेमार्गाबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंकडून अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट न झाल्याचे त्या म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा रेल्वेमार्ग पूर्णत्वास नेण्याचे जाहीरपणे आश्वासन दिल्यानंतरही केवळ सर्वेक्षणाच्या पुढे हा रेल्वेमार्ग जाऊ शकला नाही. स्वातंत्र्योत्तर काळापासून हा रेल्वेमार्ग प्रलंबित आहे. मग, अडचण नेमकी काय आहे? आता तर रेल्वे राज्यमंत्रीसुद्धा राज्याचे, त्यातल्या त्यात विदर्भाच्या सीमेवरील मराठवाड्याचे आहेत, असेही त्या म्हणाल्या.
पक्षभेद टाळून सर्वचजण अनेक वर्षांपासून जनआंदोलन करीत आहेत. निवडणुकीतही इथल्या जनतेने या मुद्यावरून वेळोवेळी साथ दिली आहे, अजून इथल्या जनतेने काय दिले पाहिजे, म्हणजे हा रेल्वेमार्ग पूर्ण होईल? विदर्भाला मराठवाड्याशी जोडतानाच प्रामुख्याने मागास समजल्या जाणाऱ्या बुलडाणा जिल्ह्याच्या विकासाला, सिंदखेडराजा व लोणार सारख्या महत्त्वाच्या पर्यटन क्षेत्राला चालना व गती मिळण्यासाठी हा रेल्वेमार्ग गरजेचा आहे. रावसाहेब दानवे यांना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रीपद मिळाल्याने हायसे वाटले होते. तथापि खामागाव-जालना रेल्वेमार्गाला ते प्राधान्य देतील ही अपेक्षा होती. मात्र, याबाबत त्यांनी एका शब्दानेही साधा उल्लेख देखील केला नाही. त्यानुषंगाने दानवेंनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे त्या म्हणाल्या.
--पुरणपोळीचे आमिष देऊन चटणी-भाकरीकडे दुर्लक्ष !--
जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या बाजूने हायस्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे. बुलेट ट्रेन करताय, याबाबत आक्षेप घेण्याचे कारण नाही; मात्र ते होत असताना विदर्भ-मराठवाड्याला जोडणारा व विकासाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेल्या खामगाव-जालना रेल्वेमार्गाकडे दुर्लक्ष होत आहे. ही बाब म्हणजे उदरनिर्वाहासाठी आवश्यक असलेली रोजची चटणी-भाकर न देता, तुम्ही आम्हाला पुरणाची पोळी आणि तूप देण्याचे आमिष देण्यासारखे असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.