‘कृतज्ञता’ भावाची जपवणूक करा, कोणत्याही क्षेत्रात अपयशी ठरणार नाही - अशोक शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 02:17 PM2019-02-01T14:17:19+5:302019-02-01T14:19:25+5:30
‘वृत्ती’सापक्षेतेपक्षा ‘कृतज्ञता’ भावाची जपवणूक करा, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कधीही अपयशी ठरणार नाही, असा आपला स्वानुभव असल्याचे ज्येष्ठ सिने अभिनेते अशोक शिंदे यांनी स्पष्ट केले.
- अनिल गवई
खामगाव: न्यूनगंड हा शाप आहे. कोणत्याही क्षेत्रात नव्हे, तर मानवी जीवनात अपयशाला तोच कारणीभूत ठरतो. आवड असलेल्या क्षेत्रात कोणताही न्यूनगंड न बाळगता स्वत:ला झोकून द्या...यश तुमच्याकडे पायघड्या घालत येईल. मात्र, एकदा का यश मिळाले की, ‘वृत्ती’सापक्षेतेपक्षा ‘कृतज्ञता’ भावाची जपवणूक करा, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कधीही अपयशी ठरणार नाही, असा आपला स्वानुभव असल्याचे ज्येष्ठ सिने अभिनेते अशोक शिंदे यांनी स्पष्ट केले. लक्ष्मीनारायण ग्रुपच्या भरारी स्रेहसंमेलनासाठी ते खामगावात आले असता,प्रस्तुत प्रतिनिधीने त्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी दीलखुलास संवाद साधला.
प्रश्न : सिनेक्षेत्रातील अभिनयाची सुरूवात कशी झाली ?
बालपणापासूनच कलेची आवड होती. शालेय जीवनात ही गोडी अधिक वृध्दीगंत झाली. मात्र, शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयाच्या क्षेत्राकडे वळलो. सिने अभिनेते मोहन जोशी, बाळ धुरी, जयंत साळगावकर, राम कदम यासारख्या कलावंतांनी संधी दिली. कधी नायक तर कधी खलनायक म्हणून अभिनयाला सुरूवात केली. अभिनय केलेले दोन सिनेमे पूर्ण झाल्यानंतरही रिलिज होवू शकले नाही. त्यामुळे सुरूवातीलाच थोडी निराशा झाली.
प्रश्न : कोणत्या कलाकृतीने आपणाला नाव लौकीक मिळवून दिला ?
सुरूवातीचे दोन चित्रपट पूर्ण होवूनही प्रदर्शीत होवू शकले नसल्याची खंत मनाशी होती. मात्र, कलेच्या क्षेत्रात प्रयत्न सुरू ठेवले. सन १९८८ साली प्रसिध्द नायिका वर्षा उसगावकर यांच्या सोबत रंगतसंगत हा सिनेमा केला. तो प्रदर्शीत झाल्यानंतर लगेचच ‘एकापेक्षा एक’ या सिनेमापासून कलाक्षेत्राशी ‘गोल्डन’सूर जुळले. ‘एकापेक्षा एक’ या सिनेमानेच आपणाला खरा नावलौकीक मिळवून दिला. १३४ सिनेमे, १०५ नाटकं आणि विविध मालिकांच्या माध्यमातून आजपर्यंत कला क्षेत्रातील प्रवास गेल्या ३० वर्षांपासून सुरू आहे.
प्रश्न : आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न आणि नशीब यापैकी महत्वाचे काय ?
प्रयत्न आणि नशीब या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन पैकी कुण्याही एकाला झुकते माप देऊन चालणार नाही. माझ्यालेखी प्रयत्न आणि नशिब दोन्ही महत्वाचे आहेत. प्रयत्न करणाºयालाच नशीबाची साथ मिळते. त्यामुळे कुणीही दोहोंपैकी कुण्या एकावरही विसंबून राहता कामा नये, असे आपले प्रामाणिक मत आहे.
प्रश्न : कला क्षेत्रात विदर्भातील कलावंत माघारल्याची कारणं काय ?
स्वप्ननगरी मुंबईमुळे पुणे, मुंबईतील कलांवतांना लवकर व्यासपीठ उपलब्ध होते. त्या तुलनेत विदर्भातील कलावंतांसाठी व्यासपीठाचा अभाव आहे. ही परिस्थिती खरी असली, तरी सध्याचे युग हे मार्केटिंगचे युग आहे. त्यामुळे पुर्वीप्रमाणे तुमच्यातील कलाकाराला दुसरा कोणी पारखणार नाही. त्यासाठी तुमचे मार्केटिंग तुम्हाला स्वत:च करावे लागणार आहे. मराठवाड्यातून पुढे येत असलेले कलाकार पाहता हे दिसून येते. सध्या उपलब्ध असलेल्या सोशल मिडियाचा योग्य वापर करत स्वत:तील कलावंत आपण समाजासमोर ठेवला पाहिजे.
प्रश्न : सेलिब्रिटींच्या ‘सोशल वर्क’ बद्दल काय सांगाल ?
खरं म्हणजे प्रत्येकालाच समाजाचे देणे लागते. मग तो सेलिब्रिटी असला काय अन् नसला काय. मुळात समाजासाठी काहीतरी करण्याची मनिषा बाळगणारा हा सेलिब्रिटीच असतो; त्याला तशी ‘ट्रीटमेन्ट’ मिळत नसेल हा भाग वेगळा. परंतु हे करताना, माणसाने प्रसिध्दीपासून दूर असले पाहिजे. याचाच अर्थ ‘दान’ करताना या हाताची खबर त्या हाताला होऊ देऊ नये. मी स्वत: हा प्रयत्न करतोय.
प्रश्न : सिने क्षेत्रातील भीती कोणती ?
अनेकजण या क्षेत्रात ऊंची गाठण्याचा प्रयत्न करतात. अनेकांचे अख्खे आयुष्य यासाठी पणाला लागते. परंतु यापेक्षाही खरी कसोटी लागते, ती मिळविलेले स्थान टिकविताना! प्रत्येक प्रसिध्द अभिनेता, अभिनेत्री यांना ‘आपला काळ संपूच नये’ असे वाटते. हीच सर्वात मोठी भीती या क्षेत्रात आहे. परंतु अंतिम सत्य प्रत्येकानेच समजून घेण्याची गरज आहे. जिथे घडाळ्याचे काटे अहोरात्र पाठशिवणीचा खेळ खेळतात; तिथे आपली काय बिशाद. त्यामुळे ‘काळ सारखा राहत नाही’ हे लक्षात घ्यावे. यशाची हवा डोक्यात न जाऊ देता, मिळेल ते काम करीत राहणारे कलावंत शारीरीक आणि आत्मिक समाधान मिळवितात. आजच्या पिढीलाही आपला हाच संदेश आहे.