मेहकर: येथील मुस्लिम समाजाचा सामूहिक विवाह सोहळ्यात बालविवाह करण्यात आल्याने नगराध्यक्षांसह तीन जणांविरुद्ध बालविकास प्रकल्प अधिकारी तथा तालुका बाल संरक्षण सचिव यांच्या तक्रारीवरून रविवारी रात्रीदरम्यान मेहकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामुहिक विवाह सोहळ्यातील सहा वधूंचे वय १८ वर्षापेक्षा कमी असल्याचे उघड झाले. मेहकर येथे २८ एप्रिल रोजी यशवंत मैदान, शाळा क्रमांक तीनच्या आवारामध्ये नगराध्यक्ष कासम गवळी यांच्या माध्यमातून सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये एकूण २४ मुस्लिम समाजातील जोडप्यांचा विवाह पार पडला होता. परंतू या सामुहिक विवाह सोहळ्यात बालविवाह झाल्याची तक्रार अॅड. उल्हासराव गणपतराव जाधव (रा. मेहकर) यांनी जिल्हाधिकारी व बालसंरक्षण अधिकाºयांकडे केली होती. त्या तक्रारी नुसार सामूहिक विवाह सोहळ्यातील जोडप्यांच्या वयाची तपासणी करण्याच्या सुचना जिल्हा बाल संरक्षण अधिकाºयांनी येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पचे बालविकास प्रकल्प अधिकारी तथा तालुका बाल संरक्षण सचिव यांना दिल्या. विवाह सोहळ्याची संपुर्ण जबाबदारी मेहकरचे नगराध्यक्ष कासम पिरु गवळी यांच्यावर होती. दरम्यान, २४ जोडप्यांपैकी १२ पेक्षा जास्त जोडप्यांतील वधूंचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी असल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. त्यानुसार बालविकास प्रकल्प अधिकाºयांनी चौकशी केली त्यामध्ये तक्रारदाराने सादर केलेल्या चित्रफितीचे अवलोकन करण्यात आले. त्यात वधू-वरांचे नावही घोषित करण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी घोषित केलेल्या वधूंच्या वयाची तपासणी करण्याकरीता संबंधीत शाळेत पत्रव्यवहार करून माहिती मागितली असता सहा वधूंचे वय १८ वर्षापेक्षा कमी असल्याचे उघड झाले. यामध्ये बालविवाह करणारे, बालविवाह विधिपूर्वक लावणारे तसेच बालविवाहास चालना देणारे सर्वजण दोषी असल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याकरीता बालविकास प्रकल्प अधिकाºयांनी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून कासम पिरु गवळी, जंगली भिराव रेघीवाले, हसन रहेमु खलीताऊ (रा. मेहकर) या तिघांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
पालिकेच्या शाळेतून मिळाले वयाचे पुरावे
सामुहिक विवाह सोहळ्यातील वधुंच्या वयाचे पुरावे पालिकेच्या शाळेतून मिळाले. त्यामध्ये नगर परिषद शाळा क्रमांक तीनचे मुख्याध्यापक, नगरपालिका शाळा क्रमांक पाचचे मुख्याध्यापक व नगर पालिका शाळा क्रमांक दोनचे मुख्याध्यापक यांच्या पत्रानुसार वधुंचे मुळ वय समोर आले. उर्वरित मुलींची नोंद दप्तरी नसल्याबाबत मुख्याध्यापकांनी पत्र दिले आहे.
विवाह लावणाºया मौलवींनी लपवली माहिती
मेहकर येथील सामूहिक विवाह मदिना मस्जिद मार्फत झाल्यामुळे या मस्जिद मौलवी जयरउद्दिन काझी यांची बालविकास प्रकल्प अधिकाºयांनी चौकशी केली असता, त्यांनी पत्र देण्यास नकार दिला. तसेच त्यांना निकाह रजिष्टरची माहिती मागितली असता त्यांनी दिली नाही.