हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : खादी व ग्रामोद्योगाचा विकास होण्यासाठी केंद्र शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून आठवड्यातून एक दिवस खादीची वस्त्रे परिधान करण्याबाबत शासनाने मध्यंतरी आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यासह बुलडाणा येथील नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या कर्मचार्यांनी आठवड्यातील एक दिवस खादीचे कपडे वापरण्याचा संकल्प केला आहे. केंद्र शासनाने खादी व ग्राम उद्योगाचा विकास होण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री, सूक्ष्म, लघु तसेच मध्यम उद्योग यांनी शासकीय कार्यालये, अशासकीय शैक्षणिक संस्था तसेच ज्या कार्यालयामध्ये ड्रेस कोड आहे, अशा सर्व कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी आठवड्यातील किमान एक दिवस खादीची वस्त्रे परिधान करावीत, असे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद म्हणून राज्य शासनाच्या सामान्य व प्रशासन विभागाने राज्यातील लघु उद्योगांना चालना मिळावी, या उद्देशाने १५ जून २0१६ रोजी एक परिपत्रक निर्गमित केले आहे. सदर परिपत्रकाच्या अनुषंगाने राज्य शासनाने राज्यातील शासकीय, निमशासकीय, कार्यालये, अशासकीय शैक्षणिक संस्था यांमधील अधिकारी, कर्मचारी यांनी पोषाखाचा एक संच खादीमध्ये तयार करून सदर पोषाख आठवड्यातून किमान एक दिवस परिधान करावा, असे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देणारा नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग असून, या विभागातील बुलडाण्यातील कर्मचार्यांनी अंमलबजावणी सुरू केली.
नववर्षापासून ड्रेस कोडची अंमलबजावणीशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नोंदणी व मुद्रांक विभागाने पूर्ण राज्यातील अधिकारी व कर्मचारी यांना खादीचा एक सारखाच एक पोषाख तयार करुन ड्रेस कोडची अंमलबजावणी सुरु केली आहे. या विभागातील बुलडाणा जिल्हय़ातील सर्व अधिकारी व कर्मचारी नववर्षात जानेवारी २0१८ पासून दर सोमवारी खादीचा ड्रेस कोड परिधान करून कार्यालयात कर्तव्यावर येत आहेत. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, इतर शासकीय कार्यालयासाठी प्रेरणादायी आहे.
बुलडाण्यात १२ कर्मचार्यांचा सहभागशासनाच्या नोंदणी व मुदांक शुल्क विभागाचे बुलडाण्यात दोन कार्यालये आहेत. सहायक जिल्हा निबंधक वर्ग-१ कार्यालयात १२ कर्मचारी तर सहायक दुय्यम निबंधक वर्ग-२ कार्यालयात ३ असे एकूण १५ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात ३ महिला कर्मचार्यांचा समावेश आहे. पुरूष कर्मचार्यासाठी खादीचा पिवळ्या रंगाचा शर्ट, करडा रंगाची पॅट तर महिलांसाठी सिक्ली रंगाची खादीची साडी असा ड्रेस कोड ठेवण्यात आला.