सामाजिक सलोखा टिकावा, शिवाय एकोप्याची भावना वृद्धिंगत होण्यासाठी उदात्त हेतूने अनेक वर्षांपासून ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून किनगावराजा पोलीस स्टेशन अंतर्गत किनगाव राजा, उमरद, ताडशिवनी, सोनोशी, सावंगी टेकाळे, वर्डडी बु., दुसरबीड, केशव शिवणी, चांगेफळ, पांगरी उगले, धानोरा, डोरवी, पांगरी तांडा असे एकूण १७ मंडळ असून यापैकी एक गाव एक गणपती ११ गावांमध्ये व एक गाव दोन गणपती ३ गावांमध्ये बसविले आहे. दहा दिवसांसाठी येणाऱ्या व भक्ताची सर्व विघ्ने दूर करणाऱ्या बाप्पाच्या आगमनाची आतुरता भाविकांनी होती. हा उत्सव गर्दी न होता शिस्तीत पार पडावा, याकरिता पोलीस प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एक गाव एक गणपती हा उपक्रम राबविण्यासाठी शासन आणि पोलीस विभाग दरवर्षी आग्रही असतो. यासाठी ठाणेदार युवराज रबडे यांनी जनजागृती केली आणि या संकल्पनेला बळ दिले.
सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन
श्री गणेशाची शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात स्थापना करण्यात आली. गणेश उत्सव निमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन केले जाते. परंतु यंदा कोरोनामुळे अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत. सर्वधर्म समभावातून गणेश उत्सव साजरा केला जातो. गणेश मंडळ आणि नागरिकांनी गणेश उत्सवात सहकार्य करावे, सर्व नियमांचे पालन करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन किनगावराजा ठाणेदार यांनी केले आहे.