मलकापूर पांग्रा: समृद्धी महामार्गावर लोणार तालुक्याच्या हद्दीत भरधाव वेगातील ट्रकने समोरील ट्रकला पाठिमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये समोरील ट्रक पुलाच्या कठड्याला धडकून उलटला. यामध्ये ट्रकमधील चालक रणजीत गौतम (४०, रा. सुलतानपूर, उत्तरप्रदेश) हा जागीच ठार झाला तर त्याचे ट्रकमधील तीन व दुसऱ्या ट्रकमधील एक जण असे चार जण जखमी झाले आहेत. हा अपघात गुरूवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडला.
हा अपघात ११ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास नागपूर कॉरिडॉरमध्ये मांडवा गावानजीक घडला. एमएच-०४- केएफ-८७४० या ट्रकला एमएच-४८-सीक्यू-४८२८ क्रमांकाच्या ट्रकने पाठीमागून धडक दिली. दोन्ही ट्रक हे जड वाहनांच्या लेनमध्येच होते. ही धडक ऐवढी जबर होती की समोरील ट्रक पुलाच्या कठड्याला धडकून उलटाल यामध्ये ट्रक चालक रणजीत गौतम (रा. सुलतानपूर, उत्तरप्रदेश) हा जागीच ठार झाला. तर ट्रकमध्ये बसलेले त्याचे तीन सहकारी संतोष छोटूलाल हरिजन (२५, उरण, मुंबई), महिंद्र गौतम (५०) आणि सोनू गौतम (३०) आणि धडक देणाऱ्या ट्रकचा चालक असे चौघेजण जखमी झाले आहेत.
एमएच-४८-सीक्यू ४८२८ क्रमांकाचा ट्रक चालक रणजीतकुमार मुकेशकुमार (५०) याने भरधाव वेगाने ट्रक चालक समोरी ट्रकला धडक दिल्याने हा अपघात झाला. एमएच-०४-केएफ ८७४० क्रमांकाच्या ट्रकमध्ये जेट विमानासाठी लागणारे ऑईल आणि अन्य काही साहित्य नेल्या जात होते. या अपघातामध्ये समोरील ट्रकचा अक्षरश: चुराडा झाला. अपघातानंतर दोन्ही वाहने महामार्गाच्या मधोमध असल्याने महामार्ग पोलिस पीएसआय गजानन उज्जैनकर, पोलिस हेडकॉन्स्टेबल विठ्टल काळुसे, निवृत्ती सानप व महाराष्ट्र सुरक्षा बलाचे अमोल जाधव, उमेश नागरे, जयकुमार राठोड यांनी वाहतूक थांबवून जखमी यांना क्यूआरव्ही टीमचे हनुमंत जायभाये,श्रीरामे यांच्या मदतीने बाहेर काढले. जखमीना प्रथम बिबी, तेथून सिंदखेड राजा आणि नंतर जालना येथे हलविण्यात आले आहे. दोन्ही अपघात ग्रस्त वाहने दुसरबीड टोल नाक्यावर लावण्यात आली आहेत.लेनचे नियम न पाळल्याने दोन दिवसात दुसरा अपघातसमृद्धी महामार्गावर लेनचे नियम न पाळल्यामुळे दोन दिवसात मेहकर-सिंदखेड राजा दरम्यान हा दुसरा अपघात झाला आहे. १० एप्रिल रोजी ट्रकचालकाने अचानक लेन बदलल्याने अपघात होऊन तीन जण गंभीर जखमी झाले होते.