जिल्हा परिषद हायस्कूलला दिली एक लाखाची देणगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:23 AM2021-07-04T04:23:31+5:302021-07-04T04:23:31+5:30
जि.प.माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव गाडेकर हे २०२० - २१ या शैक्षणिक सत्रात खामगाव येथून स्थानांतराने जि.प.हायस्कूल मंगरूळ नवघरे ...
जि.प.माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव गाडेकर हे २०२० - २१ या शैक्षणिक सत्रात खामगाव येथून स्थानांतराने जि.प.हायस्कूल मंगरूळ नवघरे येथे रुजू होण्यासाठी आले असता, शाळेची दुरवस्था व भौतिक सुविधांची वानवा असल्याचे दिसून आले. त्यांनी शाळेचा कायापालट करण्याचा संकल्प केला. या अनुषंगाने शाळेतील सर्व शिक्षकांशी चर्चा करून शाळा व्यवस्थापन समिती व गावातील निवडक नागरिकांना शाळेत बोलावून शाळेसाठी रोख १ लाख रुपयांची रक्कम देणगी म्हणून दिली. विनाविलंब शाळेच्या दुरुस्ती कामाला सुरुवात केली. गाडेकर यांच्या पुढाकाराने प्रेरित होऊन शाळेतील शिक्षकांनीही सर्व मिळून १ लाखाची मदत दिली, तर सर्व शिक्षक, गावकरी आणि शाळेचे प्राचार्य हिम्मतराव सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच शाळा व्यवस्थापन समिती व गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या सहकार्याने गावात लोकसहभागातून चळवळ राबविण्यात आली. यातून सुमारे ५ लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. गत शैक्षणिक सत्रात कोरोना काळातील सुट्ट्यांमध्येही मुख्याध्यापकांसह शाळेतील सर्व शिक्षकांनी शाळेत पूर्ण वेळ देऊन शाळा स्वच्छ सुंदर-निटनेटकी बनविली आहे. याची दखल घेत, पं.स.गटशिक्षणाधिकारी आर.डी.शिंदे यांनी या वर्षी शाळा सुरू होताच, केंद्रप्रमुख पी.टी.सोळंकी, आर.आर.पाटील यांच्यासह शाळेत जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून समाधान व्यक्त केले. शाळा सर्वांगसुंदर करून, शालेय परिसरात नंदनवन फुलविल्याबद्दल गाडेकर गुरुजींचा सत्कार केला. सर्व शिक्षक आणि ग्रामस्थांचेही कौतुक केले. या उपक्रमात मुख्याध्यापक एल.एच.सरोदे, प्रा.आर.ई.शेळके, प्रा.डी.जी.वांजोळ, एस.डी.कुलकर्णी, डी.एस.वायाळ, आर.एन.केदार, सुनयना नेवारे, जी.बी.गोसावी, जी.एस.लोखंडे, पी.एस.सुर्वे, पी.डी.डहाळे, एस.एस.खरात, एस.डी.पन्हाड, इरफान पटेल, के.एस.उंबरकार यांचा समावेश आहे.