लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यात नियंत्रणात आलेली असली तरी लसीकरणाचा वेग तुलनेने मंद असल्याचे चित्र आहे. प्रामुख्याने कोरोना हॉटस्पॉट बनलेल्या भागात हा वेग वाढविण्यावर जोर देण्याची अवश्यकता असून जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात असलेल्या ८५ हॉटस्पॉटमधील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत अवघ्या २.८९ नागरिकांचेच लसीकरण पूर्ण झाल्याचे वास्तव आहे.त्यामुळे प्रामुख्याने कोरोनाच्या हॉटस्पॉट भागात लसीकरणाचा वेग वाढविण्यावर भर देण्याची गरज आहे. बुलडाणा जिल्ह्यात शहरी भागात ३३ तर ग्रामीण भागात ५२ हॉटस्पॉट आहे. या ८५ हॉटस्पॉटमध्ये अलिकडील काळात ५५० कोरोना बाधीत तपासणीदरम्यान आढळून आले आहेत. शहरी व ग्रामीण मिळून या हॉटस्पॉटची एकूण लोकसंख्या ४ लाख ४२ हजार ७९० आहे. यापैकी केवळ ५१ हजार १९६ जणांची लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर १२ हजार ८३१ जणांनीच आतापर्यंत लसीचे दोन्ही डोस घेतले आहे. त्यामुळे या हॉटस्पॉटमध्ये लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांचे प्रमाण अवघे २.८९ टक्के आहे.त्यातच आता ‘डेल्टा प्लस’ चा धोका वाढला असून तिसऱ्या लाटेची भीती आहे. ही तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. त्यामुळे हॉटस्पॉट मध्ये लसीकरण मोहिमेला वेग देण्याची गरज निर्माण झाली आहे. दुसरीकडे सध्या लसीचे डोस आठवड्यातून किमान तीन वेळा उपलब्ध होत असल्याने येत्या काळात हा वेग वाढण्यास मदत होईल, असे लसीकरण अधिकारी डॉ. गोफणे यांनी स्पष्ट केले आहे.काेराेनाची तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता लसीकरणाची गती वाढवण्याची गरज आहे.
एकूण लसीकरण ५.९८ टक्केजिल्ह्याची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार २५ लाख ६० हजारांच्या आसपास आहे. यापैकी २१ लाख ४६ हजार ९५ नागरिकांच्या लसीकरणाचे उदिष्ठ ठेवण्यात आले आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख २८ हजार ४८४ जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहे. म्हणजे एकुण उदिष्टाच्या तुलनेत जिल्ह्यात अवघ्या ५.९८ टक्के नागरिकांचे लसीकरण पुर्ण झाले आहे. मात्र हॉटस्पॉटमध्ये हे प्रमाण अवघे २.८९ टक्के आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेत जिल्ह्यात हॉटस्पॉटवरही लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे.