महाराष्ट्रदिनी संपूर्ण जिल्ह्यात दारू बंदीचे आदेश द्यावेत
By admin | Published: April 30, 2015 01:43 AM2015-04-30T01:43:20+5:302015-04-30T01:43:20+5:30
दारु बंदीसाठी अस्तित्व महिला मंडळाची मागणी
बुलडाणा : मा जिजाऊंची जन्मभूमी व विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात येत्या महाराष्ट्रदिनी दारू बंदीचे आदेश काढून जिल्हा दारूमुक्त घोषित करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अस्तित्व महिला मंडळाच्या अध्यक्ष प्रेमलता सोनोने यांनी दिला. दारू बंदीसंदर्भात येथील पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा इशारा दिला आहे. त्या म्हणाल्या की, बुलडाणा जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभला असून, या जिल्ह्यात मा जिजाऊंचे जन्मस्थान व विदर्भाची पंढरी म्हणून संत नगरी शेगावची ओळख आहे; परंतु गेल्या काही दिवसांपासून या संत नगरीतसुद्धा दारूचा महापूर वाहत आहे. २६ लाख लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्यात सीएल-३ अनुज्ञप्ती मान्यता प्राप्त ११९ , एफएल/बी.आर. २ ४0, एफएल २ व सीएल/एफएल/टीओडी ३२0 व एफएल ३ अनुज्ञप्तीधारक २२७ दारूची दुकाने आहेत. दरवर्षी या जिल्ह्यात दोन कोटी रु पयांच्या दारूची विक्री होते. म्हणजे सरासरी एक व्यक्ती वर्षाकाठी पंधरा ते अठरा हजार रुपये दारूवर खर्च करतो. या दारुमुळे महिला व कौटुंबिक अत्याचारात वाढ झाली आहे. त्यामध्ये दहा टक्के अत्याचार करणारा हा व्यसनाधिन व्यक्ती अस तो. दारूमुळे वारंवार होणार्या कौटुंबिक कलहाचा परिणाम मुलांच्या मनावर होऊन ती गुन्हेगारी क्षेत्राकडे वळतात. तर याच दारुमुळे अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. महिलांची हेळसांड होऊ नये व जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधीत राहावी, यासाठी संपूर्ण जिल्ह्यात दारूबंदी करण्यात यावी, या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलने, उपोषण व निदर्शने करण्यात आली; परंतु अद्यापही या आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही. वास्तविक पाहता गुजरात राज्यात गेल्या काही वर्षांपासून दारू बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या राज्याचा विकास झाला नाही काय, असा प्रश्न उपस्थित करून बुलडाणा जिल्ह्यासह विकसनशील महाराष्ट्रात दारू बंदी करण्याचे आदेश देण्यात यावेत, अन्यथा हजारो महिलांसह तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अस्तित्व महिला मंडळाच्या अध्यक्ष प्रेमलता सोनोने यांनी दिला आहे.