पारिक समाजाच्या जिल्हाध्यक्षपदी गोपाल व्यास
देऊळगाव राजा : येथील माजी शिवसेना शहरप्रमुख गोपाल व्यास यांची बुलडाणा जिल्हा पारिक समाजाच्या जिल्हाध्यक्षपदी नुकतीच खामगाव येथे पार पडलेल्या पारिक समाजाच्या सभेमध्ये अविरोध निवड करण्यात आली आहे. जिल्हा सचिवपदी येथील प्रसिद्ध कर सल्लागार पवन पारिक यांची निवड करण्यात आली आहे. माजी नगरसेवक तथा माजी शिवसेना शहरप्रमुख गोपाल व्यास यांच्या कार्याची दखल घेऊन पारिक समाजाने त्यांची बुलडाणा जिल्हा अध्यक्षपदी अविरोध निवड केली.
वैद्यकीय देयके रखडली
बुलडाणा : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपचारानंतर निधीच्या उपलब्धतेवर देयके मिळत असल्याचे चित्र आहे. काेराेनाच्या काळात अनेक कर्मचाऱ्यांची देयके सहा महिन्यांपर्यंत रखडली हाेती.
बंधाऱ्यामुळे पिकांना आधार
मेहकर : तालुक्यात बंधारे बांधण्यास नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. या बंधाऱ्यामुळे भूजल पातळीत वाढ होत आहे. प्रकल्पातील जलसाठा वाढल्याने शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी आधार होत आहे. या बंधाऱ्यामुळे शेतीला चांगले पाणी मिळत आहे.
ग्रामपंचायतींचे बदलतेय रूप
डाेणगाव : चौदाव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींचा विकास होत आहे. ग्रामपंचायतीच्या इमारतीची दुरुस्ती व रंगरंगोटी केल्याने काही ग्रामपंचायतींचे रूपच बदलले आहे. काही ठिकाणी आजही इंग्रज काळातील इमारतीत ग्रामपंचायतींचा कारभार चालतो. आता अशा इमारती कात टाकत आहेत.
बाजार थंडावला, व्यावसायिक अडचणीत
सुलतानपूर : लॉकडाऊनमध्ये कापड व्यावसायिकांना आर्थिक तोटा सहन करावा लागला. दरम्यान, लग्नाच्या हंगामामध्ये काही प्रमाणात अटी शिथिल झाल्याने कापड व्यवसायाला उभारी आली होती; परंतु त्यानंतर पुन्हा बाजार थंडावल्याने कापड व्यवसाय अडचणीत सापडल्याचे दिसून येत आहे.