३६ हजार क्विंटल बियाणांची मागणी
बुलडाणा: खरीप हंगामासाठी सध्या बियाणांची जुळवाजुळव सुरू आहे. कृषी विभागाकडे २६०० क्विंटलचा लक्ष्यांक दिलेला आहे. तर, विक्रेत्यांनी ३६ हजार क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली आहे. कंपन्यांचे सोयाबीन बियाणे महागल्याचे दिसून येते.
विवाह सोहळ्यावर नजर
बुलडाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळे बेकायदेशीररीत्या पार पडणार नाहीत, याची दक्षता शहरी भागात संबंधित मुख्याधिकारी नगर पालिका तसेच ग्रामीण भागात संबंधित गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांनी घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. नियमानुसार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही आहेत.
पाणीटंचाई निवारणार्थ दोन गावांसाठी टँकर मंजूर
बुलडाणा : तालुक्यातील सुंदरखेड व नांदुरा तालुक्यातील कोलासर, सांगवा या दोन गावांमधील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता या गावांसाठी पाणीपुरवठ्याकरिता प्रत्येकी एक टँकर मंजूर करण्यात आला आहे. सुंदरखेड येथील १३,३१७ लोकसंख्येकरिता एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. हे टँकर गावाला दररोज २ लाख ६२ हजार ९४० लिटर पाण्याचा पुरवठा करणार आहे. कोलासर, सांगवा येथील ९३४ लोकसंख्येसाठी एक टँकर १८ हजार ६८० लिटर पाणीपुरवठा करणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी, निविदाधारकाने टँकर नादुरुस्त झाल्यास त्वरित दुसरा टँकर उपलब्ध करून द्यावा, असे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
बुलडाण्यात १०० पॉझिटिव्ह
बुलडाणा: तालुक्यात गुरुवारी १०० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. १३ तालुक्यांच्या तुलनेत ही रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. यातील गंभीर रुग्णांना कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.
ईपीएस ९५ पेन्शनधारक करणार आंदोलन
बुलडाणा: ईपीएस ९५ पेन्शनधारकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. या पेन्शनधारकांना केवळ ३०० ते ३ हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळते. यामध्ये कुठलाही महागाई भत्ता किंवा वैद्यकीय सुविधा मिळत नाही. दरम्यान, १ जून रोजी आपल्या विविध मागण्यांसाठी ईपीएस ९५ पेन्शनधारक उपवास आंदोलन करणार आहेत.
सागवानची अवैध वृक्षतोड
धाड : वन विभागाच्या जंगलात अवैध वृक्षतोड सुरू असल्याचे प्रकार अलीकडील काळात वाढले आहेत. सागवन वृक्ष अवैधरीत्या तोडण्यात येत असून, त्याची खुलेआम वाहतूक केली जात आहे. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे.
दूषित पाणीपुरवठा
लोणार: शहरातील विविध भागांत नळावाटे नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दुर्गंधीयुक्त व गढूळ असलेले पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ग्रामीण भागातही सध्या दूषित पाणीपुरवठ्याची समस्या अधिक आहे.
७७४ रुग्णांची कोरोनावर मात
मोताळा: येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेऊन तालुक्यात ७७४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत बरे झालेल्या या रुग्णांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड सेंटरमधून सुटी देण्यात आली आहे.
कास्ट्राईबची ऑनलाईन बैठक
बुलडाणा: राज्य कास्ट्राईब रा.प. कर्मचारी संघटना केंद्रीय कार्यकारिणीची ऑनलाईन बैठक १९ मे रोजी पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा रंगली. कामगारांचे प्रश्न व पदोन्नतीबाबतही चर्चा झाली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
पीकविम्यासाठी आंदोलनाचा इशारा
बुलडाणा: शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे नुकसान होऊनही अद्याप पीकविमा मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. ३० मेपर्यंत पीकविमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा एल्गार संघटनेेने दिला आहे.