मलकापूर तालुक्यातील जीपीएस प्रणालीचे पंचनामे फोल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 01:10 AM2017-12-15T01:10:06+5:302017-12-15T01:12:07+5:30
मलकापूर : बोंडअळी किडीचा प्रादुर्भाव झालेल्या बाधित क्षेत्राचा प्रशासकीय यंत्रणेच्यावतीने जीपीएस प्रणालीद्वारे पंचनामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. अनेक शेतकर्यांनी शेतातील कपाशी काढली आहे. जीपीएसद्वारे सर्वेक्षण करताना निरंक अहवाल देण्यात येत आहे.
मनोज पाटील।
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : बोंडअळी किडीचा प्रादुर्भाव झालेल्या बाधित क्षेत्राचा प्रशासकीय यंत्रणेच्यावतीने जीपीएस प्रणालीद्वारे पंचनामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. अनेक शेतकर्यांनी शेतातील कपाशी काढली आहे. जीपीएसद्वारे सर्वेक्षण करताना निरंक अहवाल देण्यात येत आहे.
कपाशी पिकावर गुलाबी, शेंदरी, बोंडअळी किडीचा प्रादुर्भाव झाल्याने तालुक्यातील १८ हजार २२८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. ही नैसर्गिक आपत्ती असल्याचे निश्चित झाल्याने मलकापूर तालुक्यातील सरसकट बाधित क्षेत्राचे पंचनामे करून दहा दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश शासन स्तरावरून प्रशासनाला देण्यात आले. त्यामुळे महसूल व कृषी विभागाच्यावतीने बाधित क्षेत्राचे शेतशिवारात प्रत्यक्षरीत्या जावून जीपीएस प्रणालीद्वारे पंचनामे सुरू आहेत.
आदेश निघून निम्मे दिवस लोटले आहेत. तर आता उर्वरित दिवसात एवढय़ा मोठय़ा क्षेत्राचे पंचनामे कसे करायचे? असा पेच प्रशासकीय यंत्रणेसमोर निर्माण झाला आहे. अद्ययावत तंत्रज्ञान व मनुष्यबळाचा अभाव या बाबीचा मेळ असणे अवघड असून, अशा बिकट परिस्थितीत आता ५-६ दिवसात बाधित क्षेत्राचे पंचनामे करून सदर अहवाल विभागीय आयुक्तांना देणे कृषी विभागाला शक्यच नसल्याचे दिसत आहे.
कारण पंचनामे घाईगडबडीत करणे म्हणजे शेतकर्यांचा रोष ओढवून घेणे होय. या बाबीची जाण ठेवीत तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकाचा समावेश असलेले संयुक्त पथक पंचनामे करण्यात मग्न आहेत.
दरम्यान, अनेक शेतकरी कपाशी उपटणे, त्यावर ट्रॅक्टर फिरवणे अथवा त्या पिकात जनावरे घालणे असे प्रकार करीत आहेत. मग अशावेळी त्या क्षेत्राचे पंचनामे करणे म्हणजे मोठे आव्हानच असून, हे आव्हानही या प्रशासकीय यंत्रणेला स्वीकारावे लागत आहे. या पंचनाम्यानंतर नुकसानाचे निकष व भरपाई कशी मिळणार, ही बाब गुलदस्त्यात आहे.
बाधित क्षेत्राचे पंचनामे सुरू असून, कपाशी उपटलेल्या क्षेत्राचेही पंचनामे केल्या जातील. अगदी शेवटच्या बाधित शेतकर्यांपर्यंत आम्ही पोहोचू. दरम्यान, शेतकरी बांधवांनी धैर्य ठेवीत संयमाने वागून प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे किंबहूना सद्यस्थितीतही अपेक्षित असे सहकार्य कापूस उत्पादक शेतकर्यांकडून मिळतच आहे.
- संजय पवार
तालुका कृषी अधिकारी, मलकापूर
-