बुलडाणा : तालुक्यातील अंभोडा येथील कमी उंची असलेल्या आणि दुरुस्तीला आलेल्या पुलाची समस्या आता कायमची मार्गी लागणार आहे. जि. प. सदस्य ॲड. जयश्री शेळके यांनी शुक्रवारी मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोकराव चव्हाण यांची भेट घेऊन नाबार्ड कर्जसाहाय्य योजनेअंतर्गत ही समस्या मार्गी लावण्याची मागणी केली. त्यावर त्यांनी सदर कामाचा समावेश नाबार्ड कर्जसाहाय्य योजनेअंतर्गत करण्याचे निर्देश दिले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून बुलडाणा तालुक्यातील अंभोडा येथील नदीवर पुलाचे बांधकाम अनेक वर्षांपूर्वी झालेले आहे. मात्र या पुलाची उंची खूप कमी आहे. उंची कमी असल्याने आणि दुरवस्था झाल्याने दरवर्षी पावसाळ्यात या पुलावरून पाणी वाहते. जवळपास दरवर्षी नागरिकांना या समस्येचा सामना करावा लागतो. पाणी पुलावरून वाहत असल्याने ग्रामस्थांना वाहतुकीसाठी नेहमीच अडचणी येतात. तसेच संरक्षक भिंत नसल्याने हतेडी-अंभोडा-झरी शिवारातील शेतांमध्ये पाणी शिरून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यावर्षीसुद्धा मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने अंभोडा-हतेडी येथील शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे.
शेतकरी व गावकऱ्यांची ही समस्या सोडवण्यासाठी अंभोडा येथील पुलाची उंची वाढवून पुलाचे नव्याने बांधकाम करण्याबाबत जयश्री शेळके यांनी सातत्याने पाठपुरावा केला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे विषय लावून धरला. त्यांनीही याबाबतीत सकारात्मक प्रतिसाद देत सदरचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला. दरम्यान, १८ जून रोजी त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेतली. नाबार्ड कर्जसाहाय्य योजनेंतर्गत हतेडी-अंभोडा रस्त्यावरील या पुलाची उंची वाढविण्यात यावी तसेच संरक्षक भिंत करण्याबाबत निवेदन दिले. त्यावर चव्हाण यांनी या कामाचा समावेश या योजनेअंतर्गत करण्याचे निर्देश दिले असून आता या पुलाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.