लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : प्लॅस्टिकमुळे निर्माण होणारी समस्या व प्रदूषण पाहता प्रायोगिक तत्त्वावर रस्त्याच्या कामांमध्ये प्लास्टिकचा वापर करण्यात येत असून, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यातील चार तालुक्यांतील ७० किमी लांबीच्या रस्त्यात वेस्ट प्लास्टिकचा वापर करण्यात आला आहे.बुलडाणा जिल्ह्यातील सोनाळा-भोरखेड, पिंप्री-कवठळ, पाळा, जयपूर लांडे, गोळेगाव, तरोडा परिसरातील ग्रामीण रस्त्यात त्याचा मर्यादित स्वरुपात वापर करण्यात आले असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान रस्त्यांचा दर्जा वाढविण्याच्या दृष्टीने सुरू असलेले संशोधन व विकास या हेड अंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर हा वापर केल्या जात आहे. सध्या प्लास्टिक कचरा ही एक मोठी समस्या बनू पाहत आहे. त्यादृष्टीने प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे मोठे आव्हान सार्वत्रिक स्वरुपातच आहे. त्यादृष्टीने या प्लास्टिकचा रस्त्याच्या कामात उपयोग करता येणे शक्य आहे का? यादृष्टीने सध्या वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न होत आहे. त्या अंतर्गतच बुलडाणा जिल्ह्यातील ग्रामसडक योजनेंतर्गत प्लास्टिकचा वापर केला गेला असल्याचे ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्याने सांगितले.बुलडाणा जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ६९४ किमी लांबीचे रस्ते निर्माण करण्यात येत आहेत. यात १३ कोटी रुपयांचे १४ पूल आतापर्यंत पूर्ण करण्यात आले आहेत. १९० कामे यात करण्यात येत असून, त्यापैकी ६६ कामे पूर्ण झाली आहेत, तर १०० कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. यापैकी सोनाळा, पिंप्री, तरोडा, जयपूर लांडे, गोळेगाव, पाळा परिसरात तयार करण्यात आलेल्या ग्रामीण रस्त्यांमध्ये डांबराच्या तुलनेत ८ टक्के प्रमाणात १४० मायक्रॉन दरम्यानच्या वेस्ट प्लास्टिकचे तुकडे वापरण्यात आले आहेत. रस्त्याच्या भारवहनक्षमतेनुसार याचे प्रमाण कमी जास्त राहू शकते.
कामाचे मूल्यांकनप्लास्टिकचा वापर करण्यात आलेल्या रस्त्याचे मूल्यांकनही मध्यंतरी करण्यात आले होते. रस्त्याच्या मजबुतीमध्ये त्यामुळे वाढ होत असून, पर्यावरणास घातक असे प्लास्टिकही रस्ता कामात वापरात येत असल्याने पर्यावरण संवर्धनासाठीही मदत होत असल्याचे निष्कर्ष मधल्या काळातील अभ्यासात काढण्यात आले आहेत. दरम्यान, ग्रामीण रस्त्यांची भारवहनक्षमताही १० टनांच्या आसपास आहे. २०१७ पासून वेस्ट प्लास्टिकचा रस्ते कामात वापर करण्यात येत आहे. प्रामुख्याने रस्त्याच्या खडीकरणादरम्यान हे वेस्ट प्लास्टिक वापरले जाते.