लसीकरण केंद्रांवर पोलीस बंदोबस्त द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:37 AM2021-05-08T04:37:06+5:302021-05-08T04:37:06+5:30
बुलडाणा : लसीकरण केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी होत असून फिजिकल डिस्टन्सदेखील पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे. सोबतच ...
बुलडाणा : लसीकरण केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी होत असून फिजिकल डिस्टन्सदेखील पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे. सोबतच लसीकरण केंद्रांवरील डॉक्टरांशी वाद घालण्याचे प्रकारदेखील समोर आले आहेत़ कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून लसीकरण केंद्रांवर पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी जिल्हा परिषद उपाध्यक्षा कमलताई जालिंदर बुधवत यांनी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
या पत्रात नमूद आहे की, कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असून तिसऱ्या लाटेचा धोकादेखील तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. गतवर्षीपासून आतापर्यंत सुमारे ७० हजार रुग्ण बुलडाणा जिल्ह्यात बाधित झाले असून त्यात ६४ हजारांवर बरे होऊन घरीदेखील परतले आहेत. तर, आतापर्यंत ४६० जण दुर्दैवाने दगावले आहेत. लसीकरणासाठी शासन आग्रही असून नागरिकांमध्येदेखील मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत लसींचा पुरवठा कमी होत असल्याने लसीकरण केंद्रांवर तुटवडा निर्माण होतो आहे. त्यातच नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्रांवर होत आहे. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि इतर रुग्णालये अशी तब्बल ७२ लसीकरण केंद्रे आहेत. या लसीकरण केंद्रांवर डॉक्टर व प्रशासकीय अधिकारी यांच्याशी वाद घालण्याचे प्रकारसुद्धा समोर आले असून गर्दीतील काही विघ्नसंतोषी डॉक्टरांशी हुज्जत घालून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहेत. त्यामुळे डॉक्टर आणि लसीकरण केंद्रावरील एकूणच प्रशासकीय व्यवस्था दडपणात आली आहे. करिता प्रत्येक लसीकरण केंद्रांवर पोलीस बंदोबस्त (महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह) देण्याची गरज आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून ही बाब अतिशय महत्त्वाची असून याबाबत तत्काळ पोलीस विभागाला आदेश व्हावेत, अशी मागणी जि.प. उपाध्यक्षा कमलताई जालिंदर बुधवत यांनी केली आहे.
नागरिकांनी संयम पाळावा
कोरोनाविरुद्ध युद्ध आपल्याला प्रत्येकाला लढून जिंकायचे आहे. यासाठी लस घेणे आवश्यकच आहे. मात्र, लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दीदेखील आपल्याला टाळायची आहे. ऑनलाइन स्वरूपात नोंदणी केल्यानंतर मिळालेल्या लसीकरण केंद्रावर जाऊन विहित वेळेत लस घेण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. यासाठी संयम पाळून कोरोनायोद्धे असलेल्या डॉक्टरांना सहकार्य करावे, अशी विनंतीदेखील जिल्हा परिषद उपाध्यक्षा कमलताई जालिंदर बुधवत यांनी नागरिकांना केली आहे.