चिखली : सध्या सर्वत्र गणेशोत्सव सुरू आहे. गणेशोत्सवासह येत्या काळातील सणवार शांततेत पार पडावेत यासाठी चिखलीत पोलीस दलाच्यावतीने सोमवारी पथसंचलन करण्यात आले.
पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात शहरातील प्रमुख मार्गावरून पोलिसांनी पथसंचलन केले. बसस्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, जयस्तंभ चौक, सिमेंट रोड, बैल जोडी परिसर, बाबू लॉज चौक, डीपी रोड ते पुन्हा बसस्थानकापर्यंत शिस्तबद्ध पथसंचलन पोलिसांनी केले. शहरासह ग्रामीण भागात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्बंध घातले आहेत. त्यानुसान उत्सव व सणवार साजरा करताना शासन निर्यणाचा आदर व उत्सवांचे पावित्र राखावे आणि कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे, असे आवाहन पोलीस दलाच्यावतीने करण्यात आले. या पथसंचलनात चिखली पोलीस स्टेशनसह आमडापूरचे पोलीस निरीक्षक चतरकर, पोलीस उपनिरीक्षक शिंदे आणि त्यांचे कर्मचारी आणि चिखली ठाण्याचे सपोनि बारापात्रे, पोलीस उपनिरीक्षक इंगळे, चिखली पोलीस स्टेशनचे कर्मचारी, होमगार्ड आणि बुलडाणा येथील विशेष पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.