कोलवड, हतेडी येथे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:35 AM2021-04-20T04:35:38+5:302021-04-20T04:35:38+5:30
लसीकरण दोन लाखांच्या पार बुलडाणा: जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने लसीरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत लसीकरणाचा लाभ घेणाऱ्यांची ...
लसीकरण दोन लाखांच्या पार
बुलडाणा: जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने लसीरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत लसीकरणाचा लाभ घेणाऱ्यांची संख्या दोन लाखांवर पोहोचली आहे. परंतु, अनेक ठिकाणी लसीचा तुटवडा जाणवत असल्याचे दिसून येते.
घरपोच धान्य वाटप
सिंदखेड राजा : रेशन दुकानामधून आता मोफत धान्य देण्यात येत आहे. तालुक्यातील काही दुकानदारांनी कोरोचा वाढता संसर्ग पाहता, दुकानामध्ये गर्दी होऊ नये, म्हणून घरपोच धान्य वाटपाचा उपक्रम सुरू केला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले.
कोरोनाबाबत गृहभेटीतून केला सर्व्हे
देऊळगाव राजा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृहभेटीतून सर्व्हे करण्यात येत आहे. सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आढळतात का, याची नोंद घेतली जात आहे. तसेच ग्रामपंचायतस्तरावर कोरोना टेस्टही वाढविण्यात आल्या आहेत.
घरात करमेना अन् शेतात जाता येईना
डोणगाव : कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे सर्वजण घरातच बसून आहेत. बरेच दिवस झाल्याने घरात करमत नाही. शेत दूर असल्याने दुचाकीने जावे तर पोलीस वाहने काढू देत नसल्याने कोंडी झाल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.
किराणा घेण्यासाठी नागरिकांची गर्दी
बुलडाणा : किराणा दुकानांना सध्या मुभा देण्यात आलेली आहे. त्यामुळे याठिकाणी नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे. फिजिकल डिस्टन्स पाळून नागरिकांनी किराणा खरेदी करण्याची गरज आहे. दुकान मालकांनीही याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
संचारबंदीत रस्त्यावर शुकशुकाट
धामणगाव धाड: कोरोनाला रोखण्यासाठी संचारबंदी लागू केल्याने रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. धामणगाव येथे रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे. नागरिकांनी घराबाहेर येणे टाळले आहे. आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
आवश्यक साहित्य खरेदीला अडचणी
देऊळगाव मही : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्याने मजुरांची गैरसोय होत आहे. रोजगार नसल्याने त्यांच्यासमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. काम नसल्याने हातात पैसा नाही. त्यामुळे दवाखाना, किराणा, अत्यावश्यक वस्तूंची पंचाईत झाली आहे.
ग्रामसेवकांची दांडी, कामे रखडली
मेहकर: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आटोकाट प्रयत्न करीत आहे. प्रशासकीय अधिकारी त्यासाठी झटत आहेत. मात्र, काही ग्रामसेवक गावांत अनेक दिवस येत नाहीत. कोरोनासारख्या गंभीर संकटात त्यांनी गाव वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येत आहे.
चोख पोलीस बंदोबस्त
बुलडाणा: जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ५२ हजारांवर पोहोचला आहे. त्यामुळे संचारबंदीचे उल्लंघन होऊ नये, यासाठी येथील चिखली रोडवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परंतु, दुसरीकडे शहरात नागरिक रस्त्याने फिरताना दिसून येत आहेत.
अनेक फेरीवाल्यांची नोंदच नाही
बुलडाणा: लॉकडाऊनमुळे अडचणीत असलेल्या विविध घटकांना शासनाकडून अर्थसहाय करण्यात येणार आहे. परंतु, बुलडाणा शहरातील अनेक फेरीवाल्यांची प्रशासनाकडे नोंदच नाही. त्यामुळे काही फेरीवाल्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित रहावे लागणार आहे.