जळगाव जामोद: महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाच्या निवडणुकीची मंगळवारी नागपूर येथे मतमोजणी झाली. त्यामध्ये पणन व प्रक्रिया मतदारसंघाच्या खामगाव विभागातून विद्यमान संचालक प्रसेनजित पाटील विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी राजेंद्र ठाकरे यांना १६ पैकी ७ मते मिळाली तर प्रसेनजित पाटील यांनी ९ मते मिळवित दोन मतांनी विजय प्राप्त केला. प्रसेनजित पाटील यांच्या विजयाची शक्यता ‘लोकमत’ ने वर्तविली होती.मागील दोन निवडणुकीत प्रसेनजित पाटील हे याच मतदारसंघातून अविरोध निवडून आले होते. गत तेरा वर्षांपासून ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. यावेळी मात्र त्यांना निवडणुकीला सामोरे जावे लागले. अखेर त्यांनी विजयश्री खेचून आणली. या मतदारसंघात एकूण १६ मते असून, १२ मते तालुका खरेदी-विक्री संघाच्या प्रतिनिधींची आहेत वर ४ मते प्रक्रिया संस्थेची आहेत. शेगाव, खामगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद, नांदुरा, मलकापूर, चिखली, बुलडाणा, मेहकर, देऊळगाव राजा, सिंदखेडराजा, लोणार या १२ तालुका खरेदी-विक्री संघाच्या १२ प्रतिनिधींनी यामध्ये मतदान केले. तसेच संग्रामपूर, जळगाव जामोद, मलकापूर व चिखली येथील चार प्रक्रिया संस्थांच्या ४ प्रतिनिधींनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची प्रक्रिया रविवार ११ जून रोजी शेगाव येथे पार पडली. मतदान १०० टक्के झाले. १६ मतांपैकी ९ मते प्रसेनजित पाटील यांना मिळाली तर राजेंद्र ठाकरे यांना ७ मते मिळाली. सहकार क्षेत्राची निवडणूक असली तरी त्यामध्ये राजकीय नेत्यांचा समावेश असतोच राजकीयदृष्ट्या विचार केल्यास या निवडणुकीत काँग्रेस, राकॉ व शिवसेना विरुद्ध भाजपा अशीही लढत दिसून आली. भाजपाने प्रथमच आपला उमेदवार रिंगणात उतरविला होता. त्यामुळे निवडणूक ही अत्यंत अटीतटीची झाली. तुलनेत राजेंद्र ठाकरे यांना मिळालेली मते ही समाधानकारक असल्याची भावना भाजपा कार्यक़र्त्यांनी व्यक्त केली. तर अपेक्षेपेक्षा दोन-तीन मते कमी मिळाली असे मत प्रसेनजित पाटील यांनी व्यक्त केले.
पणन महासंघ निवडणुकीत प्रसेनजित पाटील विजयी
By admin | Published: June 14, 2017 12:44 AM