‘मातृवंदन’ योजनेच्या लाभासाठी गर्भवती महिलांची १५० दिवसात नोंदणी आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 02:05 PM2017-12-29T14:05:53+5:302017-12-29T14:13:15+5:30
बुलडाणा : माता व बालमृत्यू रोखण्यासाठी उपयुक्त ‘मातृवंदन’ योजनेच्या लाभासाठी गर्भवती महिलांची १५० दिवसाच्या आत नोंदणी करणे अनिवार्य राहणार आहे. दरम्यान बुलडाणा जिल्ह्यामध्ये ३४८ आरोग्य केंद्राअंतर्गंत या योजनेस नववर्षापासून प्रारंभ होत आहे.
- हर्षनंदन वाघ
बुलडाणा : माता व बालमृत्यू रोखण्यासाठी उपयुक्त ‘मातृवंदन’ योजनेच्या लाभासाठी गर्भवती महिलांची १५० दिवसाच्या आत नोंदणी करणे अनिवार्य राहणार आहे. दरम्यान बुलडाणा जिल्ह्यामध्ये ३४८ आरोग्य केंद्राअंतर्गंत या योजनेस नववर्षापासून प्रारंभ होत आहे.
दुसरीकडे जिल्ह्यात मानवविकास कार्यक्रमाअंतर्गंत ७ तालुक्यात गर्भवती महिलांसाठी उपक्रम राबविण्यात येत आहे. जननी सुरक्षा योजनाही जिल्ह्यात सुरू आहे. या योजनेअंतर्गंत लाभ घेणाऱ्या गर्भवतींनाही ‘मातृवंदन’ योजनेचा लाभ मिळणे अपेक्षीत आहे.
जिल्ह्यात अजूनही माता मृत्यू व बाल मृत्यूचे प्रमाण अपेक्षेच्या तुलनेत कमी झालेले नाही. विशेषता ग्रामीण भागामध्ये वर्षाकाठी १०० पेक्षा अधिक बालमृत्यू होतात. या पृष्ठभूमिवर मातृवंदन योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणे अपेक्षीत आहे. मात्र या योजनेच्या लाभासाठी गर्भवती महिलेस १५० दिवसाच्या आत नोंदणी करणे आवश्यक आहे. या योजनेची अंमलबजावणी १ जानेवारी २०१८ पासून होणार असून त्याचा लाभ बुलडाणा जिल्ह्यातील ३४८ आरोग्य केंद्राअंतर्गंत देण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील गर्भवती महिलांची गर्भावस्थेत योग्य काळजी घेतली जावी, त्यांना सकस आहार देण्यात यावा, या उद्देशाने गर्भवती महिलांना मदत करण्याकरिता केंद्र शासनातर्फे १ जानेवारी २०१८ पासून मातृवंदन योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गंत महिलांना तिन टप्प्यात ५ हजार रूपयांचे अनुदान केंद्र शासनातर्फे देण्यात येणार आहे. सदर योजनेचा लाभ नोकरदार महिला सोडून सर्व गटातील महिलांना मिळणार आहे. मात्र या व्यक्तीरिक्त जननी सुरक्षा योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच अनुदान देण्यात येणार आहे. सदर रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खाते, पोस्ट खात्यावर जमा करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी परिसरातील आरोग्य केंद्राचे लसीकरण कार्ड असणे आवश्यक आहे.
तिन टप्प्यात लाभ
गर्भवती महिलेस मातृवंदन योजनेचा लाभ ३ टप्प्यात मिळणार आहे. नोंदणी झाल्यानंतर सदर महिलेस पहिल्या टप्प्यातील १ हजार रूपये देण्यात येणार आहे. त्यांनतर सहा महिने पूर्ण झाल्यावर दुसºया टप्प्यातील २ हजार रूपये देण्यात येणार आहे. त्यावेळी गर्भवती महिलेची तपासणी करण्यात येईल. तर प्रसुतीनंतर बालकाची जन्मनोंद केल्यानंतर लसीकरण पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील दोन हजार रूपयांची रक्क देण्यात येणार आहे.
३४८ आरोग्य केंद्राअंतर्गंत अंमलबजावणी
गर्भवती महिलेस मातृवंदन योजनेचा लाभ बुलडाणा जिल्ह्यातील ३४८ आरोग्य केंद्राअंतर्गंत मिळणार आहे. यासाठी सदर महिलेने आपल्या परिसरातील आरोग्य केंद्रावर आरोग्य सेविका, आशा तसेच अंगणवाडी सेविका त्यांच्या मदतीने गर्भवती झाल्यापासून १५० दिवसाच्या आत नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करण्यात येणाऱ्या आरोग्य केंद्रामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील ५२ प्राथमिक आरोग्य केंद्र, २८० आरोग्य उपकेंद्र, १२ ग्रामीण रूग्णालये, ३ उपजिल्हा रूग्णालय तसेच १ जिल्हा सामान्य रूग्णालय असे एकूण ३४८ आरोग्य केंद्रांचा समावेश आहे.