लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम : विवेकानंद आश्रमचे अध्यक्ष शुकदास महाराज यांनी सुरू केलेल्या विवेकानंद जन्मोत्सव सोहळ्याचे यंदाचे ५३ वे वर्ष असून, यावर्षीचा जन्मोत्सव सोहळा हा महाराजश्रींच्या पश्चात पहिल्यांदाच साजरा होत आहे. ६ ते ८ जानेवारी २0१८ दरम्यान हा सोहळा पार पडत असून, जन्मोत्सवासाठी विवेकानंद आश्रमाच्यावतीने जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी दिली. हिवरा आश्रम येथे मंगळवारला आयोजित पत्रकार परिषदेत संतोष गोरे बोलत होते. ते म्हणाले की, ६ जानेवारीला सकाळी नऊ ते साडेदहा वाजेच्यादरम्यान रामकृष्ण मठ, पुणेचे अध्यक्ष स्वामी श्रीकांतानंद यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन नियोजित आहे. जन्मोत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी ७ ते ९ प्रार्थना, भक्तीगीत गायनाने या सोहळ्यास सुरुवात होत आहे. यंदा प्रथमच स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे साहित्य संमेलन भरविले जात आहे. पहिल्या सत्रात युगाचार्य स्वामी विवेकानंदांची विचारधारा, या विषयावर सांगली येथील डॉ. सरिता पट्टणशेट्टी यांचे व्याख्यान, दुपारी १२ ते २ वाजेदरम्यान संत तुकाराम महाराजांचे वंशज कान्होबा महाराज, देहू यांचे कीर्तन, दुपारी दोन ते पाच शुकदास महाराजश्रींच्या प्रतिमेची सवाद्य शोभायात्रा निघणार आहे. जळगाव येथील व्याख्याते यजुवेंद्र महाजन यांचे सायंकाळी पाच वाजता व सहा वाजता स्वामी श्रीकांतानंद यांचे व्याख्यान होणार आहे, तसेच ७ व ८ जानेवारीला विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे, अशी माहिती सचिव संतोष गोरे यांनी दिली. याप्रसंगी विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष रतनलाल मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, आत्मानंद थोरहाते, विष्णूपंत कुलवंत आदींची उपस्थिती होती.
तीन लाख भाविकांना होणार महाप्रसाद वाटपविवेकानंद आश्रमात विवेकानंद जन्मोत्सव सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी ८ जानेवारी रोजी विविध कार्यक्रम व दुपारी २ वाजेपासून सुमारे तीन लाख भाविकांना पुरी-भाजीचा महाप्रसाद वितरित केला जाणार आहे. त्यानंतर प्राचार्य यशवंत पाटणे (सातारा) यांचे विवेकानंदांच्या साहित्य आणि अनुबोधांवर व्याख्यान पार पडणार असून, त्यांच्या या व्याख्यानाने विवेकानंद विचार साहित्य संमेलनाची सांगता होईल.