सामाजिक वनीकरणच्या नर्सरीत ५० लाख रोपे तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 04:29 PM2019-05-06T16:29:53+5:302019-05-06T16:29:58+5:30
१७ नर्सरीच्या माध्यमातून आतापर्यंत ५० लाख रोपे तयार केल्याची माहिती विभागीय वनाधिकारी संजय पार्डीकर यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: शासनाच्या ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत जिल्ह्यासाठी ८२ लाख ४० हजार १५० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. सामाजिक वनीकरण विभागाने १७ नर्सरीच्या माध्यमातून आतापर्यंत ५० लाख रोपे तयार केल्याची माहिती विभागीय वनाधिकारी संजय पार्डीकर यांनी दिली.
वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण यामुळे वनसंपदा धोक्यात आली आहे. वृक्षतोड सर्रास होत असल्याने जमिनीवरील वृक्षांचे अच्छादन कमालीचे कमी झाले आहे. परिणामी अनियमीत व बेभरवशाचा पावसाळा सुरु झाला आहे. कधी नव्हे असे वाढीव तापमान यावर्षी अनुभवायला मिळाले आहे. निसर्गचक्र कायम ठेवण्यासाठी सन २०१६ मध्ये राज्यात वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्यात आली. त्यानुसार ४ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले. जिल्ह्यास १६ हजार वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट दिले गेले. हे उद्दिष्ट पार पाडल्यानंतर २०१७ मध्ये राज्यात १३ कोटी तर जिल्ह्यात १ लाख ४४ हजार ९०० वृक्ष लागवड झाली. २०१८ मध्ये राज्यात ३३ कोटी व जिल्ह्यात ४४९५३७ वृक्ष लागवड चळवळ हाती घेतली गेली. तर यावर्षी ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून, जिल्ह्यासाठी ८२ लाख ४० हजार १५० रोपे लागवडीचे उद्दिष्ट आहे. त्याअंतर्गत सामाजिक वनीकरणच्या जिल्ह्यातील १७ नर्सरीमध्ये ५० लाख रोपे तयार झाली आहे.
प्रशासन वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवून रोपांची लागवड करण्यात गुंतून गेले आहे. शासनाचे विविध विभाग आणि सर्वच कर्मचारी वृक्षारोपण करणार आहेत. यासाठी आता केवळ ३० ते ४० दिवसांचा अवधी उरला आहे. सामाजिक वनीकरणने आतापर्यंत ५० लाख रोपे तयार केली आहे. यातील काही रोपे ४ फुटांपर्यंत वाढली आहेत. जिल्ह्याचे तापमान कमालीचे वाढले असतानाही कोवळी रोपे चांगले तग धरुन आहेत. वृक्ष लागवड मोहिम सुरु झाल्यावर नर्सरीमधील रोपे जिल्हाभर वाटप करण्यात येतील. (प्रतिनिधी)