- हर्षनंदन वाघ
बुलडाणा : राज्यात ५० कोटी वृक्ष लागवड मोहीम तीन टप्प्यात राबविण्यात येत आहे. त्यापैकी दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी जिल्ह्यात १ जुलै २०१८ पासून करण्यात येत असून मोहिमेत ३६ प्रशासकीय यंत्रणा सहभागी झाल्या आहेत. त्यात जिल्हा परिषदेच्या रोजगार हमी योजनेने आघाडी घेतली असून इतर योजनेच्या सहकार्याने ९ लाख ७७ हजार ८८४ खड्डें खोदून १०२ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. जिल्ह्यात १ ते ३१ जुलैदरम्यान मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यावर्षी बुलडाणा जिल्ह्याला २३ लाख ७३ हजार वृक्षलागडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून मोहिमेत एकूण ३६ प्रशासकीय यंत्रणा सहभागी झाल्या आहेत. त्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेने पुढकार घेतला असून ८६९ ग्रामपंचायतीअंतर्गंत ९ लाख ७७ हजार ८८४ खड्डे खोदून १०२ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. जिल्ह्यात सर्वत्र कमी-जास्त प्रमाणात पाऊस पडण्यास सुरुवात झाली असल्याने वातावरण आल्हाददायक आहे. त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्याातच जिल्ह्यात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून त्या अनुषंगाने जिल्ह्यातील १३ तालुक्यात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या वृक्ष लागवड मोहिमेत तालुक्यातील ग्रामपंचायती, शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक कार्यालये, महसूल विभाग, बांधकाम विभाग, शासकीय दवाखाने यांच्याकडूनही वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. वृक्ष लागवड मोकळ्या जागेत, रस्त्याच्या दुतर्फा, जलयुक्त शिवारच्या बांधावर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. सदर वृक्ष लागवडीकरीता लागणारी रोपे शासकी तसेच खाजगी रोपवाटिकेत तयार करण्यात आली आहेत. शासकीय कार्यालयांना देण्यात येणारी रोपे व निमशासकीय विभागांना, सामाजिक संघटनांना कमी दरात रोपे उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. वृक्ष लागवडीस रोपांची मागणी केलेल्या संस्थेवरच लागवड करण्यात आलेल्या रोपांचे संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्ह्यात यावर्षी प्रशासनाच्या विविध यंत्रणा सहभागी झाल्यामुळे २३ लाख ७३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी जिल्हा परिषदेच्या पंचायत यंत्रणेला ९ लाख ५८ हजार ९०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिल्यामुळे जिल्हा परिषदेचे १३ पंचायत समिती अंतर्गंत रोजगार हमी योजनेअंतर्गंत ग्रामपंचायतींनी खड्डे खोदून उद्दिष्ट पूर्ण केले आहे. सदर वृक्ष लागवड मोहीम यशस्वी होण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शष्मुखराजन एस., महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
पंचायत समितीनिहाय वृक्षरोपणासाठी खड्डे
जिल्ह्यात यावर्षी २३ लाख ७७ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी जिल्हा परिषद यंत्रणेला ९ लाख ५८ हजार ९०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्यासाठी आतापर्यंत बुलडाणा तालुक्यात ७५ हजार ६००, चिखली तालुक्यात १ लाख ८ हजार ९००, देऊळगाव राजा तालुक्यात ५२ हजार २००, सिंदखेड राजा तालुक्यात ८६ हजार ९००, मेहकर तालुक्यात १ लाख ७ हजार ९१०, लोणार तालुक्यात ६४ हजार ९००, खामगाव तालुक्यात १ लाख १० हजार ६२४, शेगाव तालुक्यात ५५ हजार २००, जळगाव जामोद तालुक्यात ५१ हजार ७००, संग्रामपूर तालुक्यात ५४ हजार ५५०, नांदूरा ७८ हजार, मलकापूर ५८ हजार ८००, मोताळा ७२ हजार असा प्रकारे जिल्हा परिषद यंत्रणेला जिल्ह्यातील १३ पंचायत समिती अंतर्गंत एकूण ९ लाख ७७ हजार ८८४ म्हणजे १०२ टक्के खड्डे वृक्ष लागवडीसाठी तयार करण्यात आले असून १ जुलै पासून वृक्षरोपण मोहीम सुरू करण्यात येणार आहे.